प्राणी संग्रहालयात 11 सिंह, 2 वाघ आणि 2 हायनांना कोरोनाची लागण; हायनाचे जगातील पहिलेच प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 07:12 PM2021-11-06T19:12:32+5:302021-11-06T19:12:42+5:30
एका हायनाचे वय 22 तर दुसऱ्याचे 23 वर्षे आहे, त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील डेन्व्हरमधून कोरोना व्हायरसबाबत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील डेन्व्हर प्राणीसंग्रहालयातील 11 सिंह आणि 2 हायनांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने याची पुष्टी केली आहे. कोविड-19 ची लागण झालेली जगातील हायनाची ही पहिलीच घटना आहे.
राष्ट्रीय पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने दिलेल्या माहितीनुसार, प्राणी संग्रहालयातील अनेक सिंह आजारी पडल्यानंतर ठिपकेदार हायनासह अनेक प्राण्यांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. या हायनाच्या नमुन्यांची कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली, जिथे ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हायनांशिवाय 11 सिंह आणि दोन वाघांनाही या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या जनावरांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
रिपोर्टनुसार, प्राणी संग्रहालयात अनेक प्राणी आजारी आढळले होते, त्यानंतर सर्वांचे नमुने घेण्यात आले. प्राणिसंग्रहालय प्रशासनाने सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह हायना सध्या पूर्णपणे निरोगी असून कोणत्याही प्रकारची समस्या नाही. प्रशासनाने म्हटले आहे की हायना हे कुख्यातपणे कठोर, लवचिक प्राणी आहेत जे अँथ्रॅक्स, रेबीज आणि डिस्टेम्परला अत्यंत सहनशील म्हणून ओळखले जातात.
प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही कोरोना संक्रमित हायनामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. त्यापैकी एक 22 वर्षांचा तर दुसरा 23 वर्षांचा आहे. दोघांमध्ये थोडीशी सुस्ती तर कधी खोकल्याची समस्याही दिसून येत आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविड पॉझिटिव्ह आढळलेले प्राणी पूर्णपणे बरे झाले आहेत किंवा जलद बरे होत आहेत.