मला आईसोबत पुन्हा भारतात यायचंय हो; पोलंडच्या ११ वर्षीय मुलीचं मोदींना भावुक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 11:44 AM2019-06-03T11:44:10+5:302019-06-03T11:44:21+5:30
पोलंडच्या 11 वर्षांच्या मुलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.
पोलंडः पोलंडच्या 11 वर्षांच्या मुलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. पत्र लिहित तिनं भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एलिजा वानात्को नावाची मुलगी आणि तिच्या आईला कालावधीपेक्षा अधिक काळ भारतात थांबल्यानं काळ्या यादीत टाकण्यात आलं. वानात्कोनं स्वतः हस्तलिखितात हे पत्र लिहिलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. पत्रात ती म्हणते, भगवान शंकरावर माझी अपार श्रद्धा आणि प्रेम आहे, नालंदा देवी पर्वत आणि गोव्यातील गाईंची केलेली सेवा कधीही विसरू शकत नाही. वानात्कोनं लिहिलेलं हे पत्र तिच्या आईनं ट्विटरवर शेअर केलं आहे.
तसेच ट्विटमध्ये तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एस. जयशंकर यांना टॅग केलं आहे. मला गोव्यातील माझ्या शाळेवर नितांत प्रेम आहे. मला एनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये गाईंची केलेल्या देखभालीची आठवण सतावते आहे. माझ्या आईला 24 मार्च 2019मध्ये भारतात येऊ दिलं नाही. तिचं नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं. कारण आम्ही इथे बऱ्याच काळापासून वास्तव्याला होतो. वानात्कोची आई ही एक कलाकार आणि फोटोग्राफर आहे. ती भारतात बी2बी व्हिसावर आलेली होती. कोटलारस्का भारतीय व्हिसाच्या नूतनीकरणासाठी श्रीलंकेला गेली होती. परंतु भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचा व्हिसा वाढवून दिला नाही आणि त्यांना 24 मार्चला परत पाठवलं. पत्रात वानात्को लिहिते, माझ्या आईला 24 मार्च रोजी दुसऱ्यांदा भारतात प्रवेश नाकारण्यात आला.
the letter my daughther who is out of school due to lack of action from MHA officers has written to Honoreable Prime Minister of India for help in our case @narendramodipic.twitter.com/PVIolpD9Ez
— Marta Kotlarska (@KotlarskaMarta) June 2, 2019
व्हिसा संपल्यानं आम्हाला काळ्या यादीत टाकण्यात आलं. आमची काहीही चूक नसताना आमच्याबरोबर असं करण्यात आलं. मी भारतीय नसले तरीही भारताला स्वतःचं घर मानते. त्यांच्या पत्राला सरकारनं कोणतंही उत्तर दिलेलं नाही. सध्या त्या माय-लेकी कंबोडियात असून, भारतात येण्याची वाट पाहत आहेत. मी भगवान शंकर आणि नालंदा देवीकडे मदतीची प्रार्थना करते. तुम्ही सर्वात शक्तिशाली व्यक्ती असल्यानं पत्र लिहित असल्याचं त्या चिमुकलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून सांगितलं आहे. आम्हाला मदत करा आणि काळ्या यादीतून आमचं नाव काढा, असंही त्या चिमुकलीनं पंतप्रधानांना सांगितलं.