जगात वर्षभरात ११० पत्रकारांची हत्या
By admin | Published: December 30, 2015 02:12 AM2015-12-30T02:12:06+5:302015-12-30T02:12:06+5:30
मावळत्या वर्षात जगभरात ११० पत्रकारांची हत्या करण्यात आली. यापैकी बहुतांश जणांना शांततामय देशात ठरवून लक्ष्य करण्यात आले, असे ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ने (आरएसएफ) मंगळवारी येथे सांगितले.
पॅरिस : मावळत्या वर्षात जगभरात ११० पत्रकारांची हत्या करण्यात आली. यापैकी बहुतांश जणांना शांततामय देशात ठरवून लक्ष्य करण्यात आले, असे ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ने (आरएसएफ) मंगळवारी येथे सांगितले.
आरएसएफने आपला वार्षिक अहवाल सादर करताना म्हटले की, यंदा ६७ पत्रकार ड्यूटीवर असताना मारले गेले, तर ४३ जणांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याशिवाय २७ सिटीजन जर्नालिस्टही मारले गेले आहेत.
माध्यम कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना अपयशी ठरल्याचे यातून प्रतिबिंबित होते. अहवालामध्ये संयुक्त राष्ट्राला पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतात २०१५ च्या प्रारंभीपासून नऊ पत्रकार ठार झाले आहेत. यातील काहींना संघटित गुन्हेगारी आणि राजकीय नेत्यांशी संबंधित वृत्तांकन करताना, तर इतरांना अवैध उत्खननाचे वार्तांकन करताना प्राण गमवावे लागले.
भारतात ड्यूटीवर असताना पाच पत्रकारांचा मृत्यू झाला, तर इतर चौघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. आरएसएफने पत्रकारांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय योजना अमलात आणण्याचे आवाहन भारत सरकारला केले आहे.