रोज 11.5 लाख मास्क!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 01:43 PM2020-04-25T13:43:59+5:302020-04-25T13:44:16+5:30
फ्रान्समध्ये आतापर्यंत दर आठवड्याला, थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 40 लाख मास्क्स तयार केले जात होते, तरीही ते कमी पडत असल्याने फ्रान्सनं आता मास्क्सची हीच संख्या आठवड्याला 80 लाख इतकी वाढवली आहे. तिथे रोज साधारणपणे 11.5 लाख मास्क्सची निर्मिती केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक अचानक सुरू झाला. तो अजूनही थांबलेला नाही. सुरुवातीच्या काळात असलेला वेग थोडासा मंदावला असला, तरी त्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. रुग्णांची संख्या वाढतेच आहे आणि मरणारांच्या संख्येतही दररोज भर पडते आहे.
शुक्रवारी दुपारपर्यंत फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांची संख्या एक लाख 21 हजार होती. 42,088 रुग्ण बरे झाले, तर आजतागायत तब्बल 21,856 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.
तिथे डॉक्टर्सची कमतरता आहे. आरोग्य सेवकांचा तुटवडा आहे. उपकरणांचीही फारच टंचाई आहे. साधे मास्कही मिळणं अवघड झालं आहे.
त्यामुळे फ्रान्स सरकारनं युद्धपातळीवर मास्क्स निर्मितीचा निर्णय घेतला असून या आठवड्यापासून मास्कनिर्मिती तब्बल चार पटींनी वाढवली आहे. मास्क्सचा हा आकडाही हादरवणारा आहे.
फ्रान्समध्ये आतापर्यंत दर आठवड्याला, थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 40 लाख मास्क्स तयार केले जात होते, तरीही ते कमी पडत असल्याने फ्रान्सनं आता मास्क्सची हीच संख्या आठवड्याला 80 लाख इतकी वाढवली आहे. तिथे रोज साधारणपणे 11.5 लाख मास्क्सची निर्मिती केली जात आहे.
यासंदर्भात फ्रान्सचेच पंतप्रधान एडुआर्ड फिलीप यांनी नुकतंच निवेदन जारी केलं आहे, की आमच्याकडे अजूनही मास्क्सची संख्या अतिशय कमी आहे. प्रत्येक नागरिकाला आम्ही मास्क्स पुरवू शकत नाही. तरी नागरिकांनी संयम राखावा!.’
यामुळे विशेषत: आरोग्य कर्मचार्यांना तरी कोरोनापासून काही काळ दूर ठेवता येईल असा फ्रान्सचा कयास आहे.
ज्या ज्या पातळीवर जे जे प्रय} करता येतील, त्यासाठी फ्रान्स सरकार आणि तिथले संशोधक झगडत आहेत.
फ्रान्सच्या संशोधकांनी कोरोना रुग्णांच्या असंख्य तपासण्याही केल्या आहेत. कोरोनाचा विषाणू कसा आणि का पसरतो, यापेक्षाही कोणामध्ये त्याचा प्रसार कमी होतो, कमी झाला आहे, याबाबतचं एक आश्चर्यजनक निरीक्षण त्यांच्या हाती आलं आहे.
फ्रान्सच्या संशोधकांच्या मते धुम्रपान करणार्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अतिशय कमी आहे. तंबाकूमध्ये ‘निकोटिन’ हा जो घटक आहे, त्यामुळे कोरोनाला अटकाव होत असावा, असा त्यांचा कयास आहे.
अर्थातच कोरोनाला रोखण्यासाठी ‘धुम्रपान करा’ असा सल्ला आम्ही देणार नाही, कारण धुम्रपान करणं अधिक घातक आहे, आणि तुमच्या आरोग्याला त्यापासून अधिक हानी पोहोचू शकते’ असा इशाराही या संशोधकांनी दिला आहे. फ्रान्सच्या पॅरीस हॉस्पिटलमध्ये यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. या अभ्यासगटाचे प्रमुख आणि प्रसिद्ध न्युरोबायॉलॉजिस्ट जीन पेरी चॅँगुक्स यांनी आपलं निरीक्षण मांडताना म्हटलं आहे, निकोटीनमुळे शरीरातील इतर पेशीत कोरोनाचा झपाट्यानं प्रसार रोखला जात असावा, असं आम्हाला वाटतंय, पण त्यासंदर्भात अजून संशोधन सुरू आहे.