इंडोनेशियात विमान कोसळून ११६ ठार
By admin | Published: July 1, 2015 03:23 AM2015-07-01T03:23:48+5:302015-07-01T03:23:48+5:30
इंडोनेशियन हवाई दलाचे विमान मंगळवारी प्रमुख शहरात कोसळून कमीत कमी ११६ जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाला आग
मेडन (इंडोनेशिया) : इंडोनेशियन हवाई दलाचे विमान मंगळवारी प्रमुख शहरात कोसळून कमीत कमी ११६ जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाला आग लागून त्याचा स्फोट झाला. आतापर्यंत ६६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘हर्क्युलिस सी-१३०’ हे विमान मेडन शहरातील एका वसाहतीत कोसळल्यानंतर अनेक इमारती जमीनदोस्त होण्यासह काही वाहने भस्मसात झाली. मेडन हे सुमात्रा बेटावरील २० लाख लोकवस्तीचे शहर आहे. या विमानात १०१ प्रवासी आणि १२ विमान कर्मचारी होते. यापैकी कोणीही जीवंत सापडण्याची शक्यता नसल्याचे हवाई दल प्रमुख अगूस सुप्रियत्न यांनी सांगितले.
या विमानातील कोणीही बचावले असेल असे मला वाटत नाही. मी दुर्घटनास्थळावरून नुकताच परतलो आहे. कोणीही वाचलेले नाही, असे त्यांनी सांगितले. प्रवाशांत बहुतांश लष्करी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा समावेश होता, असे विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)