मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 11:46 AM2023-04-29T11:46:51+5:302023-04-29T11:50:09+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर निनादला होता.

12-feet statue of Chhatrapati Shivaji Maharaj unveiled in Mauritius; Presence of Devendra Fadnavis | मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

googlenewsNext

अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे अनावरण करण्यात आलंय. आज मॉरिशस पंतप्रधान प्रविंदकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर निनादला होता.

मॉरिशसमधील मराठी मंडली फेडरेशनला महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी ४४ दशलक्ष मॉरिशस रुपये अर्थात ८ कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मॉरिशसमधील १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्याशी सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले. 

अपार उत्साहात आणि संपूर्णपणे मराठी प्रतिबिंब असलेल्या या दिमाखदार सोहळ्यात मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अॅलन गानू, इतर मंत्री, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशस मराठी मंडली फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद प्रामुख्याने उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी भगिनी आणि बांधव पारंपारिक पोषाखात या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजचा दिवस अतिशय भावनात्मक दिवस आहे. आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे उभारण्यात आला. याबद्दल मी मॉरिशसच्या पंतप्रधान आणि येथील मराठी समुदायाचा आभारी आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि १२ कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो. आम्ही अनेक राजे पाहिले पण छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी, शौर्य, साहस अन्य कुणामध्ये नव्हते. म्हणूनच त्यांना 'श्रीमंत योगी' म्हणतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, जलसंवर्धन, समुद्री सामर्थ्य, किल्ले निर्मिती, प्रबंधन, अर्थव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था इत्यादी क्षेत्रातील त्यांचे सामर्थ्य आणि चातुर्य आजही तितकेच मार्गदर्शक आहे. या पुतळ्याच्या उदघाटनासाठी ५००० कि.मी. दूर तुम्ही मला निमंत्रित केले आणि हे भाग्य मला लाभले, हे मी माझे पूर्वपुण्य समजतो. महाराजांनी आपल्याला 'महाराष्ट्र धर्म' शिकविला. देव-देश आणि धर्मासाठी जगण्याची शपथ वयाच्या १४व्या वर्षी होणारे आमचे हे आदर्श राजे आहेत. भारतीयांच्या मनामनात वीरतेचे बीजारोपण करण्याचे काम महाराजांनी केले, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

Web Title: 12-feet statue of Chhatrapati Shivaji Maharaj unveiled in Mauritius; Presence of Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.