सौदी अरेबियातल्या हल्ल्यांप्रकरणी 12 पाकिस्तानींना अटक
By admin | Published: July 8, 2016 01:18 PM2016-07-08T13:18:06+5:302016-07-08T13:18:06+5:30
सोमवारी मदिना येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रकरणी 12 पाकिस्तानी नागरिकांसह 19 जणांना अटक करण्यात आल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 8 - सोमवारी मदिना येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रकरणी 12 पाकिस्तानी नागरिकांसह 19 जणांना अटक करण्यात आल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केले आहे. शियांच्या मशिदीजवळ करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एकूण सात जण ठार तर 2 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नईर मोस्लेम हम्माद अल बलावी हा सौदी नागरिक या हल्ल्यांमागचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा हल्ला तिघा दहशतवाद्यांनी केला होता. जेद्दाह मध्ये झालेला हल्ला अब्दुल्ला कलझर खान या पाकिस्तानी व्यक्तिने केल्याचे तपासात आढळले आहे. ड्रायव्हर असलेला अब्दुल्ला गेली 12 वर्षे सौदीमध्ये आहे. मदिना येथे झालेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले होते. तर कातिफमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये तीन जण ठार झाले होते. या हल्ल्यांची अद्याप कुठल्याही दहशतवादी गटाने जबाबदारी घेतलेली नाही.
मुस्लीमांसाठी दुसऱ्या क्रमांकाचं पवित्र स्थान असलेल्या मदिनामध्ये प्रथमच आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला आहे. प्रेषित मोहम्मद यांनी बांधलेली मशिद या ठिकाणी असून या स्थळांची संरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचे राज्यकर्ते सौद घराणे मानते. तर, इस्लामिक स्टेटने सौद घराणे धर्मभ्रष्ट असून त्यांची राजवट उलथून टाकण्याची घोषणा केली आहे. सौदी अरेबियावर हल्ले करण्याचे आदेश इसिसचा नेता अबू बकर अल बगदादी याने दिले असून त्यानंतर हे हल्ले झाले आहेत.
सौदीमधले तरूण कट्टरतावादाकडे झुकत असून याबाबत सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी चिंता व्यक्त केली आहे.