इस्रायली हल्ल्यात १२ पॅलेस्टिनी ठार
By admin | Published: August 25, 2014 04:21 AM2014-08-25T04:21:33+5:302014-08-25T04:21:33+5:30
गाझामध्ये इस्रायलने रविवारी केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या एका वरिष्ठ वित्त अधिकाऱ्यासह १२ पॅलेस्टिनी ठार झाले
गाझा/जेरूसलेम : गाझामध्ये इस्रायलने रविवारी केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या एका वरिष्ठ वित्त अधिकाऱ्यासह १२ पॅलेस्टिनी ठार झाले. इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्ष ४८ दिवसांचा झाला असून त्यात आतापर्यंत २,२०० जण ठार तर १०,५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गरज असेल तोपर्यंत हल्ले सुरूच राहतील, असे स्पष्ट केले. इस्रायलने गाझातील १३ मजली इमारत रविवारी हवाई हल्ल्यांद्वारे जमीनदोस्त केली. त्याआधी रहिवाशांना तेथून निघून जाण्यास सांगण्यात आले होते. गाझातील उंच इमारतींना इस्रायलने लक्ष्य केले आहे. या उंच इमारतींमध्ये दहशतवादी यंत्रणा असून तेथील रहिवाशांनी तेथून दूर जावे, असे इस्रायलच्या वतीने अॅटोमेटेड फोनद्वारे सांगण्यात येत आहे.
उत्तर भागात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ वित्त अधिकारी मोहंमद अल आउल मारला गेला. तीन वरिष्ठ हमास कमांडरानंतर मोहंमदच्या रूपाने हमासचा आणखी एक अधिकारी ठार झाला.
जो कोणी आमच्यावर रॉकेट हल्ले करील त्याला कोणालाही सूट मिळणार नाही, असे आम्ही ठरविलेले आहे, असे सांगून नेतान्याहू यांनी इराकमधील इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी गटाशी हमासची तुलना केली. गाझामध्ये आमचे संरक्षणाचे उपाय आमचे उद्दिष्ट गाठले जात नाही तोपर्यंत थांबणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
गेल्या आठ जुलैपासून इस्रायल व हमासदरम्यान सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत २२०० नागरिक मारले गेले आहेत. मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींमध्ये ७० टक्के सामान्य नागरिक असल्याचे संयुक्त राष्ट्राचे म्हणणे आहे. या काळात ६८ इस्रायली मारले गेले आहेत. (वृत्तसंस्था)