अवघ्या १२ वर्षांच्या जॅक्सन ओस्वॉल्टच्या घरी FBI ! 'या' चिमुरड्याने असं नेमकं केलं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:28 IST2025-03-25T11:28:29+5:302025-03-25T11:28:51+5:30

अमेरिकेच्या मेम्फिस शहरातील जॅक्सन ओस्वॉल्ट हा बारा वर्षांचा एक लहानगा मुलगा. लहानपणापासूनच त्याला विज्ञानाची आवड.

12-year-old Jackson Oswalt achieves nuclear fusion how the parents supported his dream | अवघ्या १२ वर्षांच्या जॅक्सन ओस्वॉल्टच्या घरी FBI ! 'या' चिमुरड्याने असं नेमकं केलं तरी काय?

अवघ्या १२ वर्षांच्या जॅक्सन ओस्वॉल्टच्या घरी FBI ! 'या' चिमुरड्याने असं नेमकं केलं तरी काय?

अमेरिकेच्या मेम्फिस शहरातील जॅक्सन ओस्वॉल्ट हा बारा वर्षांचा एक लहानगा मुलगा. लहानपणापासूनच त्याला विज्ञानाची आवड. त्याचा दिवस सुरू होतो तो विज्ञानाचे प्रयोग करत आणि संपतोही तसाच. प्रत्येकाला कसली ना कसली आवड असते, ध्येय असतं; पण जॅक्सनचं ध्येय होतं ते म्हणजे न्यूक्लियर फ्युजन रिॲक्टर तयार करण्याचं आणि संशोधक होण्याचं. चक्क वयाच्या बाराव्या वर्षी त्यानं हे उपकरण तयार केलंही!

त्याच्या या कर्तृत्वानं सारेच आश्चर्यचकित झाले असून, इतक्या लहान वयात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारा तो पहिलाच विक्रमवीर ठरला आहे. २००८मध्ये त्याने टेलर विल्सनचा ‘टेड टॉक’ शो बघितला होता. त्यात टेलरनं आपण १४व्या वर्षीच न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर कसा तयार केला, याविषयी माहिती सांगितली होती. त्यासाठी त्यानं काय काय केलं होतं, त्यासाठी तो कसा झपाटला होता, कोणकोणत्या अडचणींवर त्यानं कशी मात केली, हे त्यानं सांगितलं. टेलरच्या या बोलण्यानं जॅक्सन फारच प्रभावित झाला आणि टेलर हे करू शकतो तर आपण का नाही, या प्रश्नाचा भुंगा त्याच्या मनात फिरू लागला. त्याच दिवसापासून त्यानं कामाला सुरुवात केली. वाचायला, माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी अनेक तज्ज्ञांचंही त्यानं मार्गदर्शन घेतलं. अर्थात आईवडील तर त्याच्या मदतीला होतेच. त्यांनी जॅक्सनला त्यांच्या परीनं विज्ञानाची जेवढी माहिती सांगता येईल, तेवढी सांगितली. काही तज्ज्ञांशी त्याची भेटही घडवून दिली आणि त्यासाठीचं आर्थिक बळही पुरवलं.

जॅक्सनच्या आईवडिलांनी त्याचा उत्साह आणि आवड पाहून त्याला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी तर दाखवली, पण एक महत्त्वाची अट घातली... तू जे काही करशील, ते फक्त तुझ्या एकट्याच्या डोक्यानं करू नकोस. त्याआधी अभ्यास कर, तुला काय काय अडचणी येताहेत, तुला कसली मदत हवी, त्याची नोंद कर, त्यानुसार तज्ज्ञांना भेट आणि मगच पुढची पावलं उचल. त्यातले धोके आधी तू समजून घे आणि प्रयोग करीत असताना आता एकही धोका नाही, याची खात्री पटल्यानंतरच प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात कर, तरच आम्ही तुला मदत करू. 

जॅक्सननं त्यांचं म्हणणं मनापासून मानलं. स्वत: तर या संदर्भातला अभ्यास केलाच, पण तज्ज्ञांशी बोलून अनेक गोष्टींची माहिती करून घेतली. या प्रयोगासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू त्यानं स्वत:च जमवल्या होत्या. आपल्याच शहरातून, आसपासच्या दुकानांतून विकत आणल्या होत्या; पण काही गोष्टी त्याला त्याच्या शहरात मिळणं शक्यच नव्हतं. त्यासाठी मग त्यानं इकॉमर्स वेबसाइटस्चा आधार घेतला. तिथून त्यानं तब्बल सात लाख रुपयांचे स्पेअर पार्टस, वेगवेगळ्या प्रकारची सामग्री जमा केली आणि आपल्या बेडरूममध्येच प्रयोगाला सुरुवात केली. हे उपकरण तयार करण्यासाठी जॅक्सननं व्हॅक्युम पंप आणि चेंबरचा उपयोग केला. न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर तयार केल्यानंतर चक्क अमेरिकेच्या ‘एफबीआय’ एजंटस्नीही त्याच्या घरी अचानक भेट दिली आणि काही ‘धोका’ तर नाही ना, याची खात्री करून घेतली.

जॅक्सन म्हणतो, या प्रयोगात रेडिएशन आणि हाय व्होल्टेज विजेचा मोठा धोका होता; पण मी हे सारे धोके पार करू शकलो, याचा मला फार आनंद आहे. यासाठी मी माझे आई-वडील आणि तज्ज्ञांचा फार आभारी आहे!

Web Title: 12-year-old Jackson Oswalt achieves nuclear fusion how the parents supported his dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.