१२ वर्षांचा राहुल ‘चाइल्ड जिनियस’, भारतीय वंशाच्या मुलाची इंग्लंडमध्ये कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 02:26 AM2017-08-21T02:26:14+5:302017-08-21T02:26:38+5:30
ब्रिटनमधील ‘चॅनेल ४’ या दूरचित्रवाहिनीच्या स्मरणशक्ती आणि सामान्यज्ञान यावर आधारित स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून, राहुल दोशी हा १२ वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा ‘चाइल्ड जिनियस’ ठरला.
लंडन : ब्रिटनमधील ‘चॅनेल ४’ या दूरचित्रवाहिनीच्या स्मरणशक्ती आणि सामान्यज्ञान यावर आधारित स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून, राहुल दोशी हा १२ वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा ‘चाइल्ड जिनियस’ ठरला.
लंडनमध्ये शिकणाऱ्या राहुलने शनिवारी रात्री झालेल्या अंतिम फेरीत नऊ वर्षांच्या रोनन याचा १० विरुद्ध ४ असा पराभव केला. म्हणजे अंतिम फेरीत विचारलेल्या सर्व १० प्रश्नांची उत्तरे राहुलने अचूक दिली, तर रोननची फक्त चार उत्तरे बरोबर आली.
आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात स्पर्धकांच्या स्मरणशक्तीसोबत गणित, इंग्रजी, इतिहास व इंग्रजी स्पेलिंगच्या ज्ञानाचा कस लागला. एडवर्ड जेन्नरने वैद्यकीय क्षेत्रात लावलेले शोध हा राहुलने आवडीचा विषय म्हणून निवडला होता व त्यावरच त्याला सर्वाधिक प्रश्न विचारले गेले, पण त्याला खरा विजय मिळवून दिला, तो १९ व्या शतकातील विल्यम होलमन हंट आणि जॉन एवरेट मिलाईस या दोन कलावंतांशी संबंधित प्रश्नांच्या उत्तरांनी. राहुलचे वडील मिनेश आयटी मॅनेजर, तर आई कोमल फार्मसिस्ट आहे. (वृत्तसंस्था)
अजूनही विश्वास बसत नाही, पण खूप बरे वाटले. डोक्यातून इतर सर्व काढून टाकून डोके शांत ठेवून स्पर्धेतील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करायचे, हे तंत्र मी ठरविले होते, ते यशस्वी ठरले.
- राहुल दोशी