बॉम्बच्या जोकवरुन अमेरिकेत १२ वर्षाच्या शीख मुलाला धाडले सुधारगृहात
By Admin | Published: December 18, 2015 01:37 PM2015-12-18T13:37:30+5:302015-12-18T14:01:14+5:30
वर्गमित्रासोबत थट्टामस्करी करताना बॅगेमध्ये बॉम्ब ठेवला आहे असे गंमतीने म्हटले म्हणून अमेरिकेत एका १२ वर्षाच्या मुलाला तब्बल तीन दिवस तुरुंगात ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १८ - वर्गमित्रासोबत थट्टामस्करी करताना बॅगेमध्ये बॉम्ब ठेवला आहे असे गंमतीने म्हटले म्हणून अमेरिकेत एका १२ वर्षाच्या शीख मुलाला तब्बल तीन दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरमान सिंग सराई असे या मुलाचे नाव आहे. वर्गामध्ये मित्रासोबत थट्टामस्करी करत असताना अरमान गमतीने त्याच्या मित्राला आपल्या बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचे म्हणाला.
अरमानचा मित्र शिक्षकाकडे गेला आणि अरमानच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे त्याने सांगितले. शिक्षकाने शाळेच्या मुख्याध्यापकांना याची माहिती दिली. मुख्याध्यापकांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता सरळ पोलिसांना बोलावले. पोलीसांनी संपूर्ण वर्ग रिकामा केला आणि बॅगांची झडती घेतली असता, बाँब आढळला नाही.
अरमान सिंगने पोलीसांना सांगितले की, बाँब असल्याचे मी म्हणालो, परंतु ती मस्करी आहे, बाँब वगैरे काही नाही असंही सांगितलं. पोलीस अधिका-यांनी अशा प्रकारची थट्टा केली तर त्रास हा होणारच अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परिणामी अरमानला तीन दिवस बालसुधारगृहात रहावे लागले.
सोमवारी त्याची सुटका झाली. गिनी हेअर या अरमानच्या चुलतबहिणीने फेसबुकवरुन या घटनेची माहिती दिली. अरमान टेक्सासच्या निकोलस ज्यूनियर हायस्कूलमध्ये शिकत आहे. एका लहान मुलाला अशी वागणूक देणं अमानुष असल्याचं गिनीचं म्हणणं असून या त्रासाबद्दल जाब मागण्याचा विचार अरमानचा मोठा भाऊ अक्ष सिंग याने व्यक्त केला आहे.