अवघ्या १२ वर्षांच्या मुलीनं शाळेत ब्रेड विकून खरेदी केला iPhone 14, आता हे चांगलं की वाईट?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 05:31 PM2023-03-24T17:31:54+5:302023-03-24T17:32:59+5:30
संयुक्त अरब अमिरातच्या दुबई शहरात एका भारतीय व्यक्तीच्या १२ वर्षीय मुलीनं स्वत: केलेल्या कमाईतील iPhone 14 खरेदी केला आहे.
संयुक्त अरब अमिरातच्या दुबई शहरात एका भारतीय व्यक्तीच्या १२ वर्षीय मुलीनं स्वत: केलेल्या कमाईतील iPhone 14 खरेदी केला आहे. इयत्ता ७ वीत शिकत असलेल्या बियांका जेमी वारियावा हिनं स्वत: बनवलेले ब्रेड शाळेत विकण्यास सुरुवात केली आणि अवघ्या सहा आठवड्यांमध्ये ३ हजार दिरहम (६७ हजार ३६२ रुपये) कमावले. तिनं तयार केलेले ब्रेड शाळेतील मुलांसोबतच शिक्षकांनाही आवडले.
बियांका हिला आयफोन खूप आवडतो आणि आपल्याकडेही असा स्मार्टफोन हवा अशी तिची इच्छा होती. पण तिच्या आई-वडिलांकडे इतके पैसे नव्हते की ज्यातून ते आपल्या मुलीला आयफोन खरेदी करुन देतील. फेब्रुवारी महिन्यात एक दिवस बियांच्या आईनं एक ब्रेड तयार करुन दिला जो तिनं स्वत: तयार केला होता. ब्रेड बियांकाच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींनाही खूप आवडला.
"माझ्या मित्र-मैत्रिणींना ब्रेड आवडला. त्यांना तो इतका आवडला की त्यांनी पुन्हा मला दुसऱ्या दिवशी देखील आणायला सांगितला", असं बियांका म्हणाली. यानंतर बियांकाला एक कल्पना सुचली आणि ती स्वत: आईकडून ब्रेड बनवायला शिकली. मग ती शाळेतील मुलांना ब्रेड तयार करुन विकू लागली.
बियांच्या पालकांनी याआधी दुबईच्या फाइव्ह-स्टार हॉटेलमध्ये काम केलं आहे. त्यामुळे बियांकानं लहानपणापासूच घरच्यांना किचनमध्ये काही ना काही खास पदार्थ तयार करताना पाहिलं आहे. बियांकाची कल्पना तिच्या आई-वडिलांनाही आवडली आणि ते खूश झाले. वडील जेमीभाई वारियावा यांनी बियांकाला १०० दिरहम (२ हजार २४५ रुपये) दिले आणि यातूनच ब्रेड बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात करण्यास सांगितलं. बियांकानं आईकडून वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड बनवायचे धडे घेतले आणि त्याचा सदुपयोग करत स्वत: कमाईला सुरुवात केली.
कसे कमावले हजारो रुपये?
बियांकानं शाळेत ब्रेड विक्री सुरू केल्याच्या पहिल्या दिवशी तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पण तिनं हार मानली नाही. तिनं शाळेत ब्रेड विकणं सुरूच ठेवलं. ती १० दिरहमला (२२४ रुपये) चार ब्रेड विकायची. बघता बघता बियांकाचे ब्रेड शाळेत खूप लोकप्रिय झाले आणि विक्रीही वाढली. आता दरदिवशी ती ब्रेडचे ६० पीस विकू लागली होती.
"मी फक्त साधा ब्रेड विकत नाही. तर सॉफ्ट रोल, ओरियो, उबे (फिलिपिन्सची पेस्ट्री), पनीर टर्की सलामी आणि चिनक फ्रँकसारखे पदार्थही ती तयार करते. हे सारंकाही माझ्या मित्रमैत्रिणींसोबतच शाळेच्या शिक्षकांनाही आवडलं", असं बियांका सांगते. बियांकानं मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्या व्यवसायातून ३ हजार दिरहमचा नफा कमावला आणि आयफोन-१४ विकत घेतला.