इटालीमध्ये भूकंपात १२० मृत्युमुखी; कोसळली अनेक घरे
By Admin | Published: August 25, 2016 04:46 AM2016-08-25T04:46:05+5:302016-08-25T04:46:05+5:30
इटलीत बुधवारी पहाटे झालेल्या शक्तिशाली भूकंपात १२० लोकांचा बळी गेला.
एकुमोली (इटली) : इटलीत बुधवारी पहाटे झालेल्या शक्तिशाली भूकंपात १२० लोकांचा बळी गेला. उम्ब्रिया, मारचे आणि लाजियो बुरीदरम्यान विस्तारलेल्या दुर्गम भागात सर्वाधिक विध्वंस घडून आला असून, भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
एमाट्रिस, एकुमोली आणि अरकाटा डेल टोरँटो या गावात आणि लगतच्या परिसरात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून, कित्येक बेपत्ता आहेत, असे आपत्कालीन विभागाचे प्रमुख इम्माकोलाटा पोस्टीगलायने यांनी सांगितले. ‘माझी बहीण आणि भावजी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आम्ही ढिगारा उपसणाऱ्यांची प्रतीक्षा करीत आहोत; परंतु ते
अद्याप येथे आले नाहीत’, असे एकुमोलीजवळील
एका गावच्या रहिवाशाने सांगितले. इटालीत झालेल्या तीव्र भूकंपामुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली असून, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. कित्येक जण बेपत्ता आहेत. भूकंपग्रस्त भागातील मदतकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी पंतप्रधान मॅट्टीओ रेन्झी यांनी त्यांचा नियोजित फ्रान्स दौरा रद्द केला आहे. या पूर्वी इटलीमध्ये २००९ साली भयंकर
भूकंप झाला होता, त्या वेळी ३०० जणांचा मृत्यू झाला होता. अनेक नागरिकांना त्या भीषण भूकंपाची या वेळी आठवण झाली.