कारच्या खास नंबरसाठी माेजले १२२ काेटी रुपये; दुबईतील लिलावात रेकाॅर्ड ब्रेक बाेली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:54 AM2023-04-11T03:54:22+5:302023-04-11T03:54:47+5:30
वाहन खरेदी केल्यानंतर अनेकांना आवडता नाेंदणी क्रमांक हवा असताे. त्यातही काही खास क्रमांक असतात.
दुबई :
वाहन खरेदी केल्यानंतर अनेकांना आवडता नाेंदणी क्रमांक हवा असताे. त्यातही काही खास क्रमांक असतात. त्यांच्यासाठी वाट्टेल तेवढी किंमत माेजायची तयारी असते. असाच एक क्रमांक काही लाखांमध्ये नव्हे तर तब्बल १२२ काेटी रुपयांत विकला गेला. दुबईमध्ये पी७ (P7) या क्रमांकासाठी लिलावात ५ काेटी दिरहॅम एवढ्या रकमेची बाेली लागली. ही तेथील विक्रमी बाेली ठरली आहे.
झुमेरा यथील ‘फाेर सीझन’ नावाच्या हाॅटेलमध्ये व्हीआयपी नंबरप्लेट आणि फाेन क्रमांकांसाठी लिलाव आयाेजित करण्यात आला हाेता. दिरहॅम हे दुबईतील चलन आहे. ‘पी७’ या क्रमांकासाठी १.५ काेटी दिरहॅमपासून बाेली लागण्यास सुरुवात झाली. काही सेकंदातच बाेली ३ काेटी दिरहॅमच्या वर पाेहाेचली. ५.५ दिरहॅमवर गेली. ही बाेली विजयी ठरली. बाेली लावणाऱ्याचे नाव सांगण्यात आले नाही. लावणाऱ्याने ओळख गुप्त ठेवण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. प्रत्येक बाेलीला टाळ्या वाजवून प्रतिसाद मिळत हाेता.
एवढी रक्कम गाेळा
१० काेटी दिरहॅम म्हणजे सुमारे २२३ काेटी रुपयांहून अधिक रक्कम या लिलावातून गाेळा झाली. रमजान महिन्यात लाेकांना भाेजन देण्यासाठी या रकमेचा वापर होणार आहे. दान भावनेच्याच हेतूने दुबईचे शासक शेख माेहम्मद बिन राशिद यांनी या लिलावाचे आयाेजन केले हाेते.
५.२२ काेटी दिरहॅमची बाेली २००८ मध्ये अबुधाबी येथील ‘१’ या क्रमांकासाठी लावली हाेती. हा विक्रम माेडीत निघाला.