काँगोमध्ये इबोलाचा 12 वा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 03:24 PM2018-05-28T15:24:41+5:302018-05-28T15:24:41+5:30
इक्वेटर प्रांत, इबोको, ग्रामिण बिकोरो आणि बंदाका या तीन विभागांमध्ये इबोला पसरलेला आहे.
किन्शासा- काँगोमध्ये इबोलाच्या साथीने पुन्हा थैमान घातले असून आतापर्यंत 12 लोकांचे प्राण या आजारामुळे गेले आहेत. काँगोच्या आरोग्य मंत्रालयाने या मृत्यूबद्दल माहिती दिली. देशाच्या वायव्येस असणाऱ्या इक्वेटर प्रांतामधील इबोको येथील ग्रामिण भागात इबोलाने 12 वा बळी घेतला आहे. आतापर्यंत काँगोमध्ये इबोलाचे 35 रुग्ण सापडले आहेत.
इक्वेटर प्रांत, इबोको, ग्रामिण बिकोरो आणि बंदाका या तीन विभागांमध्ये इबोला पसरलेला आहे. काँगोचे आरोग्यमंत्री ओली इलुंगा कालेंगा यांनी बिकोरो आणि इबोको येथे शनिवारी हेलिकॉप्टरने जाऊन तेथिल आरोग्य सुविधांची माहिती घेतली. येथील परिसरामध्ये इबोलाची लस देण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. त्यांच्याबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन आणि युनिसेफचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
बंदाका येथए इबोला लस देण्याचा उफक्रम आधीपासूनच सुरु ढाला आहे. तेथे इबोलाचे चार रुग्ण सापडले आहेत. 1976 पासूनचा काँगोमधील इबोलाची साथ पसरण्याची ही 9 वी वेळ आहे. इबोलावर कोणतीही विशिष्ट उपचारपद्दती नाही. ताप येणे, उलट्या होणे, डायरिया, स्नायू दुखणे, अंतर्गत रक्तस्राव अशी विविध लक्षणे इबोलाची आहेत.