१३० विवाह करणाऱ्या मुस्लीम प्रचारकाचे निधन
By Admin | Published: February 1, 2017 01:12 AM2017-02-01T01:12:18+5:302017-02-01T01:12:18+5:30
इस्लाममध्ये पुरुषाला केवळ चारच नव्हे तर कितीही बायकांशी विवाह करण्याची परवानगी आहे, असा कुरआनचा अर्थ लावून स्वत:च्या आयुष्यात त्याचे पालन करणारे नायजेरियातील
इस्लाममध्ये पुरुषाला केवळ चारच नव्हे तर कितीही बायकांशी विवाह करण्याची परवानगी आहे, असा कुरआनचा अर्थ लावून स्वत:च्या आयुष्यात त्याचे पालन करणारे नायजेरियातील माजी वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक मोहम्मद बेल्लो अबुबकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. नायजेर राज्यातील बिदा येथे अबुबकर यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले, असे त्यांचे स्वीय सहाय्यक मुतैरु सलावुदीन बेल्लो यांनी सांगितले.
‘अल्लाने नेमून दिलेले काम पूर्ण झाल्याने आता माझी जाण्याची वेळ झाली आहे. अल्लाला भेटायला माझी तयारी आहे,’असे बाबांनी (अबुबकर) जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्याला सांगितले, असेही मुतैरू सलावुदीन म्हणाले. रविवारी अबुबकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तेव्हा त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे वृत्त ‘डेली मेल’ने दिले.
सर्वसाधारणपणे इस्लामने पुरुषला चार बायका करण्याची मुभा दिली आहे, असे मानले जाते व धर्मप्रचारकही बहुधा तेच सांगत असतात. परंतु अबुबकर यांनी कुरआनचा वेगळा अर्थ लावला व जेवढ्या सहजपणे सांभाळता येतील तेवढ्या बायका मुस्लिम पुरुष करू शकतो, असा त्यांनी प्रचार केला. त्यांनी स्वत:ला उमगलेला हा कुरआनचा अर्थ आचरणातही आणला आणि ९३ वर्षांच्या आयुष्यात तबाबल १३० बायकांची लग्न केले. त्यांच्यापासून अबुबकर यांना एकूण २०३ मुले झाली. पिकल्या वयात निधन झाले तेव्हाही त्यांच्या काही पत्नी गरोदर असल्याचे सांगण्यात येते! त्यांच्या ८६ पत्नी सध्या हयात आहेत.
सन २००८ मध्ये इतर धर्मप्रचारकांनी अबुबकर यांच्यावर सडकून टीका केली व फक्त चार बायका ठेवून त्यांनी इतरांना तलाक द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. पण ‘शक्य असेल तोपर्यंत लग्न करत राहणे, हे मला अल्लाने नेमून दिलेले काम आहे,‘ असे सांगून अबुबकर यांनी तसे करण्यास ठाम नकार दिला होता.