जपानमधील कोरोनाग्रस्त क्रूझवर अडकलेल्यांमध्ये १३८ भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 06:42 AM2020-02-09T06:42:59+5:302020-02-09T06:43:27+5:30
जपानने समुद्रात नांगरून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवर ३,७०० प्रवासी अडकले आहेत.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, म्हणून जपानने समुद्रात नांगरून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवर ३,७०० प्रवासी अडकले असून, त्यात १३२ कर्मचारी व सहा प्रवासी असे १३८ भारतीय आहेत.
क्रूझवरील ६४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून योकोहामापासून दूर अंतरावर नांगरण्यात आलेल्या क्रूझचा क्वारंटाइन कालावधी १९ फेब्रुवारीला संपेल. चीननंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्त या क्रूझवर आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की, क्रूझवरील कर्मचारी व प्रवाशांमध्ये असलेल्या भारतीयांना कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र, आम्ही क्रूझशी संपर्क साधून आहोत. क्रूझवरील सर्वांना जपान सरकार मदत करीत आहे. क्रूझ गेल्या सोमवारी योकोहामा बंदरात आल्यानंतर प्रवाशांची तपासणी केली असता २० जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले. त्यानंतर संख्या वाढत गेली.
हाँगकाँगमध्ये वर्ल्ड ड्रीम या जहाजावरील ८ जणांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने ते जहाज दूर समुद्रात उभे केले आहे. वेस्टरडॅम या जहाजालाही बंदरात येण्यास जपान व तैवानने परवानगी नाकारली आहे.
१५ केरळी विद्यार्थी परतले
हुबेई प्रांतातील १५ केरळचे विद्यार्थी कोचीला परतल्यावर त्यांची विमानतळावर शनिवारी वैद्यकीय तपासणी झाली. हे विद्यार्थी चीनमधील कुनमिंग येथून बँकॉकला गेले. तिथून शुक्रवारी रात्री कोचीला आले. त्यांना कालामसेरी रुग्णालयात दाखल केले आहे. या विद्यार्थ्यांना भेटण्यास त्यांच्या नातेवाइकांना परवानगी नाकारण्यात आली.