नायजेरियातील एका गावावरील भीषण हल्ल्यात १४ गावकरी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:50 AM2020-08-15T02:50:06+5:302020-08-15T02:50:33+5:30
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, उकुरू गावात ही घटना घडली. या हल्ल्यात पाच जण जखमीही झाले आहेत.
नवी दिल्ली : नायजेरियातील उत्तर-मध्य भागात असलेल्या नायजेर प्रांतात काही बंदूकधाऱ्यांनी एका गावावर केलेल्या भीषण हल्ल्यात १४ जण ठार झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, उकुरू गावात ही घटना घडली. या हल्ल्यात पाच जण जखमीही झाले आहेत.
पोलिसांचे प्रवक्ते वासियू अबियोदून यांनी सांगितले की, हल्लेखोर दरोडेखोर असावेत, असा संशय आहे. या गावातील स्थानिक सुरक्षा समूहाचे नेते अशफ मायकेरा यांनी सांगितले की, हल्ल्याच्या एक दिवस आधी रात्रीच्या वेळी हल्लेखोर ५० मोटारसायकलींवरून गावात येऊन गेले होते. हल्ल्यानंतर १३ पुरुष आणि एक स्त्री असे १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी सांगितले की, या हल्ल्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. नायजेरियाच्या वायव्य आणि उत्तर-मध्य प्रांतात दरोडेखोर २०१९ पासून हल्ले करीत आहेत.
जूनमध्येही हल्ला
अपहरण आणि लुटमार हा त्यांचा उद्योग आहे. याचा फायदा घेऊन काही सशस्त्र गटही दरोडेखोरांच्या आडून संघटित हल्ले करतात. जून महिन्यातील अशाच दुहेरी हल्ल्यात २० सैनिक आणि ४० नागरिक ठार झाले होते. नायजेरियातील बोर्नो राज्यातील या हल्ल्यात शेकडो लोक जखमीही झाले होते.