पाकिस्तानातील स्फोटात १४ ठार
By admin | Published: April 26, 2017 01:05 AM2017-04-26T01:05:19+5:302017-04-26T01:05:19+5:30
पाकिस्तानच्या हिंसाचारग्रस्त खुर्रम एजन्सी भागात तालिबान दहशतवाद्यांनी रिमोट कंट्रोल बॉम्बने एका व्हॅनला उडविले.
पेशावर : पाकिस्तानच्या हिंसाचारग्रस्त खुर्रम एजन्सी भागात तालिबान दहशतवाद्यांनी रिमोट कंट्रोल बॉम्बने एका व्हॅनला उडविले. या हल्ल्यात १४ ठार, तर १३ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खुर्रम एजन्सीच्या कोंटारा गावात दहशतवाद्यांनी आयईडीद्वारे व्हॅनला लक्ष्य केले. तालिबानचा फुटीर गट जमातुल अहरारने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मृतांत दोन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोटात १३ लोक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना पेशावर येथे आणण्यासाठी एमआय-१७ हे हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे, असे लष्कराच्या माध्यम शाखेने सांगितले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. पाराचिनार शहरात गेल्या आठवड्यात घडवून आणण्यात आलेल्या आत्मघाती कारबॉम्ब स्फोटात २८ ठार, तर इतर १०० जण जखमी झाले होते.