अमेरिकी काँग्रेसमध्ये निवडून आल्या १४१ महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 05:17 AM2020-11-16T05:17:25+5:302020-11-16T05:17:42+5:30
नवा विक्रम; कमला हॅरिस पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष; स्त्री शक्तीचा साक्षात्कार
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत भारतीयवंशीय व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्या. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. या निवडणुकांत अमेरिकन काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच १४१ इतक्या विक्रमी संख्येने महिला लोकप्रतिनिधी विजयी झाल्या असून त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त आहे.
२०१८ मध्ये अमेरिकी काँग्रेसच्या काही जागांसाठी मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यांच्या निकालानंतर महिला लोकप्रतिनिधींची संख्या १२७ झाली होती. कमला हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारी रोजी होईल. कमला हॅरिस यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लिटल गर्ल्सच्या (महिला) शक्तीचा साक्षात्कार अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकांत दिसून आला.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या २०१६ साली झालेल्या निवडणुकीत
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पराभवानंतर हिलरी क्लिंटन म्हणाल्या होत्या की, राष्ट्राध्यक्षपदावर आजवर एकही महिला निवडून आलेली नाही. मात्र, ती गोष्ट अमेरिकेतील
लिटल गर्ल्स एक ना दिवस साध्य करतील.
महत्त्वाची खाती महिलांना मिळण्याची शक्यता
नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अर्थमंत्रिपदी सिनेटर एलिझाबेथ वॉरेन किंवा लेइल ब्रेनार्ड यांची नियुक्ती करतील, अशी चर्चा आहे. संरक्षणमंत्री पदावर मिशेल फ्लोर्नो यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.