१४५ वर्षांच्या गोथोंना जगाचा घ्यायचाय निरोप
By admin | Published: August 29, 2016 02:32 AM2016-08-29T02:32:59+5:302016-08-29T02:32:59+5:30
जगातील सर्वांत वयोवृद्ध अशी ओळख असलेल्या इंडोनेशियाच्या म्बा गोथो (१४५) यांनी मला मरायचे आहे, असे सांगितले.
पेटालिंग जाया : जगातील सर्वांत वयोवृद्ध अशी ओळख असलेल्या इंडोनेशियाच्या म्बा गोथो (१४५) यांनी मला मरायचे आहे, असे सांगितले. जगात सर्वांत वयोवृद्ध बनलेल्या गोथो यांची मुलाखत घेण्यासाठी वार्ताहर आले होते.
गोथो म्हणाले की, ‘‘मी १९९२पासून माझ्या मृत्यूची तयारी करीत आहे. मी माझ्या थडग्यावरील दगडही तयार करून ठेवला आहे तरी मी अजून जिवंतच आहे.’’ ते म्हणाले की, ‘‘माझी दृष्टी खालावत चालल्यामुळे मी टीव्ही बघू शकत नाही म्हणून माझा वेळ फक्त रेडिओ ऐकण्यात जातो.’’ गोथो यांच्याकडे असलेल्या अधिकृत दस्तावेजावरून आणि इंडोनेशियन दप्तरानुसार त्यांचा जन्म ३१ डिसेंबर १८७० रोजीचा.
या दस्तावेजाची स्वतंत्रपणे खातरजमा केली तर गोथो यांचे नाव सर्वांत वयोवृद्ध म्हणून इतिहासात नोंदले जाईल. सध्या अशी नोंद जीनी काल्मेंट या फे्रंच महिलेच्या नावावर आहे. त्यांचा मृत्यू झाला त्या वेळी त्या १२२ वर्षांच्या होत्या. (वृत्तसंस्था)
जन्म १८७०मधील : उपलब्ध कागदपत्रांवरून गोथो यांचा जन्म १८७०मधील आहे. गोथो त्यांची १० भावंडे, चार पत्नी आणि मुलांपेक्षा जास्त जगले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना चमच्याने अन्न भरवावे लागत आहे व ते दिवसेंदिवस अशक्त बनत चालले आहेत.