पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 10:45 AM2024-06-13T10:45:51+5:302024-06-13T10:47:30+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम २७८ अब्ज रुपये अधिक आहे.
Pakistan Union Budget 2024-25: पाकिस्तानने २०२४-२५ च्या वार्षिक बजेटमध्ये देशाच्या संरक्षणासाठी २,१२२ अब्ज रुपये राखून ठेवले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम २७८ अब्ज रुपये अधिक आहे. अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी बुधवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पादरम्यान ही माहिती दिली. या अर्थसंकल्पात संरक्षणातील कर्मचारी संबंधित खर्चात ८१५ अब्ज रुपये, ऑपरेशन खर्चासाठी ५१३ अब्ज रुपये, शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि उपकरणे खरेदीसाठी ५४८ अब्ज रुपये, नागरी कामांसाठी २४४ अब्ज रुपये समाविष्ट आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानचे संरक्षण बजेट १,८५४ अब्ज रुपये होते.
पाकिस्तानच्या बजेटवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची छाप
निधीचे वाटप अंदाजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अनुमानाशी संबंधित आहे. दक्षिण आशियाई देश अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी विस्तारित निधीचा अशाप्रकारे वापर करतात. त्याचीच छाप यात दिसून येते. गेल्या आर्थिक वर्षात वाटप केलेल्या १.८०४ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हे १९% पेक्षा जास्त वाढ दर्शवते.
पाकिस्तानला IMF कडून हवे आणखी कर्ज
पाकिस्तानने गेल्या महिन्यातच डीफॉल्टर यादीतील नाव रोखण्यासाठी नऊ महिन्यांचा ३ अब्ज डॉलर्सचा आर्थिक उपक्रम पूर्ण केला. परंतु पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सरकारने नवीन, दीर्घकालीन कार्यक्रमाच्या गरजेवर भर दिला आहे. IMF च्या मते, देशांतर्गत आणि बाह्य असमतोल दूर करण्याच्या उद्देशाने अल्प-मुदतीच्या कार्यक्रमाने सकारात्मक परिणाम दिले आहेत, ज्यामध्ये मध्यम आर्थिक वाढ, सुधारित वित्तीय स्थिती आणि परकीय चलनाचा साठा वाढला आहे.