१५ अतिरेक्यांचा केला खात्मा, अमेरिकेकडून मोठी कारवाई, इराकच्या अनबर वाळवंटात संयुक्त मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 11:02 AM2024-09-01T11:02:03+5:302024-09-01T11:03:23+5:30
International News: पश्चिम इराकमध्ये अमेरिका आणि इराकी सैनिकांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संशयित ठिकाणांवर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. अमेरिकी लष्कराच्या सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.
बगदाद - पश्चिम इराकमध्ये अमेरिका आणि इराकी सैनिकांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संशयित ठिकाणांवर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. अमेरिकी लष्कराच्या सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. या कारवाईदरम्यान अमेरिकेचे ७ जवान जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांत अमेरिकेने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. इराक आणि सीरियामध्ये दहशतवाद्यांना प्रभावक्षेत्रातून बेदखल करण्यात आल्यानंतर या भागात तैनात असलेले अमेरिकी सैनिक आणि इसिसदरम्यान वर्षानुवर्षे सातत्याने लढाई सुरू आहे. अमेरिकी सूत्रांनुसार, दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रांसह बॉम्ब तसेच आत्मघाती स्फोटकांसह सज्ज होते. इराकी लष्करानुसार देशातील अनबर वाळवंटात हा हल्ला करण्यात आला. (वृत्तसंस्था)
इस्लामिक स्टेटला जेरीस आणण्याचा प्रयत्न
इराकला लागून असलेल्या संपूर्ण प्रदेशात इराकी तसेच अमेरिकी नागरिकांसह या देशांच्या सहकाऱ्यांवर हल्ल्यांचा कट किंवा हल्ले करणाऱ्या इस्लामिक स्टेटच्या प्रमुख दहशतवाद्यांना जेरीस आणण्याचा तसेच त्यांची शक्ती क्षीण करण्याचा या अभियानाचा उद्देश होता, असे अमेरिकेच्या सूत्रांनी म्हटले आहे.
कारवाईत ७ अमेरिकी सैनिक जखमी
- अमेरिका-इराकने केलेल्या या संयुक्त कारवाईत ७ अमेरिकी सैनिकही जखमी झाले असल्याचे एका अधिकाऱ्याने आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
- या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे हा अधिकारी म्हणाला.
कारवायांमध्ये वाढ
इस्लामिक स्टेटचे दहशतवादी इराक आणि सीरियात पुन्हा आपले बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या भागात त्यांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. २०२४च्या पहिल्या सहा महिन्यांतच या दोन्ही देशांत असे १५३ हल्ले झाले आहेत.