15 वर्षीय मुलीचा भन्नाट शोध, पावसाच्या थेंबापासून वीजनिर्मित्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 05:51 PM2018-07-11T17:51:43+5:302018-07-11T17:54:00+5:30
15 वर्षीय युवतीने वीज उत्पादनाचा नवीन शोध लावला आहे. इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या रेगानने पावसाच्या पाण्यापासून वीजनिर्मित्तीचे तंत्र विकसीत केले आहे.
अजरवैजान - जगातील प्रत्येक देश डीजिटल बनण्याचे स्वप्न बाळगून आहे. पण, या डीजिटल दुनियेत वीजेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे अधिकच्या वीज उत्पादनासाठी प्रत्येक देशाकडून जोराचे प्रयत्न आणि अभ्यास करण्यात येत आहे. आता, अजरवैजान येथील रेगान जामालोवा या 15 वर्षीय युवतीने वीज उत्पादनाचा नवीन शोध लावला आहे. इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या रेगानने पावसाच्या पाण्यापासून वीजनिर्मित्तीचे तंत्र विकसीत केले आहे.
पावसाच्या थेंबापासून वीज निर्मित्तीचे डिव्हाईस रेगानने बनवले आहे. या तंत्रज्ञानाला तिने रेनर्जी असे नाव दिले आहे. या तंत्रज्ञानापासून तयार करण्यात आलेल्या वीजेला बॅटरीमध्ये साठवून ठेवता येते. त्यानंतर घरगुती कामांसाठी या वीजेचा वापर करता येईल. सध्या हे एक प्रोटोटाईप असून त्यामध्ये 7 लिटर पाणी साठवता येत आहे. जर हवेपासून वीजनिर्मित्ती होऊ शकते, तर पाण्यापासून का नाही ? असा प्रश्न 15 वर्षीय रेगानला पडला. याबाबत तिने आपल्या वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर मैत्रिणीच्या मदतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या संशोधनात रेगानला तिच्या भौतिकशास्त्र विषयाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. रेनवॉटर कलेक्टर, वॉटर टँक, इलेक्ट्रिक जनरेटर आणि बॅटरी या सर्व साधनांचे मिळून रेवाने 9 मिटर लांबीचे डिव्हाईस बनवले आहे. या संशोधनामुळे अजरवैजान सरकारने रेवानला 20 हजार डॉलर रुपयांचे अनुदान दिले. या डिव्हाईसद्वारे घरातील 3 बल्ब सहज प्रकाशित होतील, एवढी वीज निर्माण होते.