१५० एकर जमीन, ७२१ फूट उंची, ६०० कोटी खर्च; जगातील सर्वात मोठे राम मंदिर ऑस्ट्रेलियात बांधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 04:28 PM2024-01-19T16:28:06+5:302024-01-19T16:30:56+5:30
ऑस्ट्रेलियातील पार्थ शहरात राम मंदिर बांधण्यात येणार आहे.
अयोध्येत राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून जगभरात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातील राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. हे मंदिर जगातील सर्वात उंच होणार असून या मंदिराची उंची ७२१ फूट असणार आहे.
ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात श्री राम वैदिक अँड कल्चरल ट्रस्टतर्फे राम मंदिर बांधले जाणार आहे. श्री सीताराम ट्रस्टचे उपप्रमुख डॉ. हरेंद्र राणा यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पर्थ शहरातील १५० एकर जागेवर ६०० कोटी रुपये खर्चून श्री राम मंदिर बांधले जाणार आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.दिलावर सिंग हे गेल्या ३५ वर्षांपासून ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहेत.
डॉ.हरेंद्र राणा म्हणाले की, हा प्रकल्प मंदिर या पारंपरिक संकल्पनेच्या पलीकडचा आहे. हे मंदिर सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि सामुदायिक क्रियाकलापांचा समावेश असलेले बहु-कार्यात्मक केंद्र म्हणून बांधले जाईल.
मंदिर परिसरात असणार या सुविधा
मंदिर परिसरात हनुमान वाटिका, सीता वाटिका, जटायू बाग, शबरी वन, जामवंत सदन, नल नील टेक्निकल आणि गुरु वशिष्ठ नॉलेज सेंटर असेल. मंदिर संकुलात एक मेणबत्ती पोर्च, चित्रकूट वाटिका, पंचवटी वाटिका उद्यान आणि प्रस्तावित राम निवास हॉटेल देखील बांधले जाईल.
मंदिरात सीता रसोई रेस्टॉरंट, रामायण सदन लायब्ररी आणि तुलसीदास हॉल सारखी सांस्कृतिक ठिकाणेही बांधली जातील. मंदिर संकुलातील ५५ एकर जागेवर सनातन वैदिक विद्यापीठ उभारले जाणार आहे. यासोबतच हनुमान वाटिकेत १०८ फूट उंचीची हनुमानाची मूर्ती स्थापन केली जाईल.
मंदिरात शिव सप्त सागर नावाचा तलाव बांधण्यात येणार असून, यामध्ये भगवान शंकराची ५१ फुटांची मूर्ती असेल. मंदिरात योगा कोर्ट, मेडिटेशन कोर्ट, वेद लर्निंग सेंटर, रिसर्च सेंटर आणि म्युझियम यांसह अध्यात्मिक ठिकाणे असतील. मंदिरात तंत्रज्ञान उद्यानासारख्या क्षेत्रासह काही तांत्रिक बाबींचाही समावेश असेल.
मंदिराच्या बांधकामात ‘झिरो कार्बन फूटप्रिंट’ची विशेष काळजी घेतली जाईल, असे ट्रस्टने सांगितले. जैव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचाही या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. वैदिक ग्रंथांच्या अभ्यास आणि प्रचारासाठी वाल्मिकी केंद्रही बांधले जाईल.
श्री राम वैदिक अँड कल्चरल ट्रस्टचे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे एक शिष्टमंडळ अयोध्येत श्री राम मंदिराच्या दर्शनासाठी येणार आहे. शिष्टमंडळाचा हा प्रवास २७ फेब्रुवारीला पर्थ येथून सुरू होणार आहे.