...अन् १६ भिकाऱ्यांना विमानातून उतरविले; पाकिस्तानी भिकाऱ्यांमुळे आखातात समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 09:13 AM2023-10-02T09:13:32+5:302023-10-02T09:13:48+5:30
पाकिस्तानचे दारिद्र्य व दुर्दशा कोणापासूनही लपून राहिलेली नाही.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे दारिद्र्य व दुर्दशा कोणापासूनही लपून राहिलेली नाही. तेथील अनेक लोक दोनवेळच्या जेवणालाही मोताद झाले आहेत. कदाचित त्यामुळेच पाक आता भिकाऱ्यांचा निर्यातदार बनला आहे. मुल्तानहून सौदी अरेबियाला जाणाऱ्या एका विमानातून १६ भिकाऱ्यांना खाली उतरविण्यात आले. त्यामध्ये १ लहान मूल, ११ महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता, असे पाकिस्तानी वृत्तवाहिनी डॉनने एफआयएच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
या लोकांना देश सोडून उमरा व्हिसाद्वारे सौदी अरेबियाला जायचे होते. व्हिसा प्रक्रियेदरम्यान एफआयए अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी परदेशात भीक मागण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. भीक मागून मिळणाऱ्या कमाईचा अर्धा भाग त्यांची प्रवास व्यवस्था करणाऱ्या एजंटांना द्यावा लागतो, असेही त्याने चौकशीत सांगितले.
जगात ९० टक्के पाकिस्तानी भिकारी
परदेशात पकडलेल्या भिकाऱ्यांपैकी ९० टक्के पाकिस्तानी आहेत. पाकिस्तानी भिकाऱ्यांच्या अटकेमुळे इराकी आणि सौदी राजदुतांनी त्यांच्या तुरुंगात गर्दी वाढल्याचे सांगितले आहे. बहुतेक भिकारी सौदी अरेबिया, इराण व इराकमध्ये जाण्यासाठी हज यात्रेसाठी दिलेल्या व्हिसाचा गैरफायदा घेतात.