गोळ्या घालून 16,000 हजार घोड्यांना ठार केले जाणार, ऑस्ट्रेलियाने का घेतला हा निर्णय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 08:18 PM2023-10-30T20:18:04+5:302023-10-30T20:18:45+5:30
ऑस्ट्रेलियन सरकारने 16000 हजार घोड्यांना गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिडनी: ऑस्ट्रेलियातील सरकारने एक विचित्र निर्णय घेतला आहे. घोड्यांची संख्या कमी करण्यासाठी हजारो घोड्यांना गोळ्या घालून ठार केले जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानातील घोड्यांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने हेलिकॉप्टरमधून त्यांना शूट केले जाईल. दक्षिण-पूर्व ऑस्ट्रेलियातील कोशियस्को नॅशनल पार्कमधील घोड्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या राष्ट्रादीय उद्यानात सुमारे 19,000 जंगली घोडे आहेत, ज्यांना "ब्रम्बी" म्हणून ओळखले जाते. न्यू साउथ वेल्स राज्य अधिकारी 2027 च्या मध्यापर्यंत ही संख्या 3,000 पर्यंत कमी करू इच्छितात. त्यामुळेच घोड्यांना मारण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. घोड्यांची संख्या कमी करण्यासाठी अधिकारी आधी घोड्यांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु न्यू साउथ वेल्सचे पर्यावरण मंत्री पेनी शार्प म्हणाले की, हा उपाय आता पुरेसा नाही.
वन्य घोड्यांच्या मोठ्या संख्येमुळे संपूर्ण पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे आता त्यांना ठार केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विशेष म्हणजे, गेल्या 20 वर्षांत जंगली घोड्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे, ज्यामुळे ते जलमार्ग अडवतात आणि मूळ प्राण्यांचे निवासस्थान नष्ट करतात. गेल्या वर्षी NSW सरकारने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय उद्यानात जंगली घोड्यांची संख्या 18,814 पर्यंत होती. कठोर उपाययोजना न केल्यास पुढील दशकात घोड्यांची संख्या 50,000 पर्यंत वाढू शकते, असे पर्यावरण गटांनी यापूर्वी म्हटले आहे.
ब्रम्बी पर्यावरणाला कसे हानी पोहोचवतात?
ब्रम्बी किंवा जंगली घोडे जलमार्ग आणि झाडीपट्टीचा नाश करतात. हे मूळ वन्यजीवांना मारतात, ज्यात कोरोबोरी बेडूक, रुंद-दात असलेले उंदीर आणि दुर्मिळ अल्पाइन ऑर्किडचा समावेश आहे. NSW सरकार जंगली घोड्यांची संख्या व्यवस्थापित करण्यासाठी ग्राउंड शूटिंग, ट्रॅपिंग आणि रीहोमिंगवर अवलंबून आहे, परंतु हे पुरेसे नाही. म्हणूनच NSW पर्यावरण मंत्री पेनी शार्प यांनी ऑगस्टमध्ये घोड्यांना हेलिकॉप्टरद्वारे गोळ्या घालून ठार करण्याचा प्रस्ताव मांडला.