नायजेरियाजवळ समुद्री चाच्यांकडून जहाजाचं अपहरण; 18 भारतीयांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 08:19 AM2019-12-05T08:19:39+5:302019-12-05T08:21:13+5:30
भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू
Next
नवी दिल्ली: नायजेरियाच्या समुद्र किनाऱ्याजवळ एका जहाजाचं अपहरण करण्यात आलं आहे. हे जहाज हाँगकाँगचं असल्याची माहिती समोर येत असून त्या जहाजावर एकूण १८ भारतीय आहेत. समुद्रातील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या एका जागतिक एजन्सीनं याबद्दलची माहिती दिली आहे.
Sources: Indian mission is in touch with Nigerian authorities after reports of kidnapping of 18 Indians onboard the Hong Kong vessel, that was hijacked near Nigeria. pic.twitter.com/2qkqParF7C
— ANI (@ANI) December 5, 2019
व्हीएलसीसी नेव्ह कॉन्स्टेलेशन या जहाजाचं नायजेरियाजवळ समुद्री चाच्यांनी अपहरण केलं. याबद्दलची माहिती मिळताच भारतीय दूतावासानं नायजेरियन प्रशासनाशी संपर्क साधला. अपहृत जहाजावर एकूण १९ जण असून त्यातील १८ जण भारतीय आहेत, तर एक जण तुर्कस्तानचा रहिवासी आहे. समुद्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्या एआरएक्स मॅरिटाईमनं दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगचा झेंडा असलेल्या व्हीएलसीसी नेव्ह कॉन्स्टेलेशन जहाजावर मंगळवारी (३ डिसेंबर) संध्याकाळी नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी हल्ला केला. याआधी २००८ मध्ये सोमालियाजवळ एडनच्या आखातात एक जहाज समुद्री चाच्यांनी ताब्यात घेतलं. त्यामध्ये १८ भारतीयांसह एकूण २२ प्रवासी होते.