हेलिकॉप्टर कोसळून युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह १८ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 08:44 AM2023-01-19T08:44:42+5:302023-01-19T08:45:11+5:30
मृतांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी, तीन बालकांचा समावेश
कीव्ह : युक्रेनचे एक हेलिकाॅप्टर बुधवारी कोसळून त्या देशाचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की तसेच त्या खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी यांच्यासह १८ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे.
गेल्या चार दिवसांत युक्रेनमध्ये घडलेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या एका निवासी इमारतीतील काही रहिवासी ठार झाले होते. युक्रेनचे हेलिकॉप्टर कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या दुर्घटनेमागे रशियाचा हात आहे का, याबाबत युक्रेनने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. युक्रेनमधील ब्रोव्हरी येथे हेलिकॉप्टर कोसळून १८ जण ठार झाल्याच्या दुर्घटनेबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्या देशाचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाल्याबद्दल ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हमन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकेत विमान कोसळून चार ठार
अमेरिकेत छोट्या आकाराचे एक विमान मंगळवारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत टेनेन्सी चर्चच्या चार ख्रिश्चन धर्मगुरूंचा मृत्यू झाला व एक धर्मगुरू जखमी झाला आहे. टेक्सास विमानतळावर हे विमान उतरण्याच्या काही वेळ आधी हा अपघात झाला. हे विमान योकुम येथील शेतात कोसळले.
इंजिनात बिघाड झालेले विमान सुखरूप उतरविले
ऑस्ट्रेलियातील क्वांटास या कंपनीचे प्रवासी विमान न्यूझीलंडवरून सिडनी येथे येत असताना दोनपैकी एक इंजिन खराब झाले. तरीही पायलटनी हिंमत दाखवून हे विमान एका इंजिनावर चालविले व सिडनी येथील विमानतळावर सुरक्षितपणे उतरविले. त्या विमानात १४५ प्रवासी होते. त्यांच्यापैकी एकालाही दुखापत झाली नाही.