1900 रूपयात देतो ऑनलाइन धमकी, आतापर्यंत कमावले को्टयवधी रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 02:16 PM2017-08-15T14:16:43+5:302017-08-15T14:17:12+5:30
सुपारी घेऊन ऑनलाइन धमकी देणा-या एका तरूणाला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. आरोपीकडून आता वेगवेगळे खुलासे होत आहेत.
जेरूसलेम, दि. 15 - सुपारी घेऊन ऑनलाइन धमकी देणा-या एका तरूणाला इस्त्राइल पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. आरोपीकडून आता वेगवेगळे खुलासे होत आहेत. या आरोपीने पैसे घेऊन आतापर्यंत अमेरिकेतील जवळपास 250 शाळा आणि यहुदी सेंटर्सना धमकी दिली आहे. जर धमकी यशस्वी नाही झाली तर हा आरोपी ग्राहकाला त्याचे पैसेही परत करायचा. अलफाबे नावाच्या ऑनलाइन डार्क वेब मार्केटद्वारा तो ही सेवा पुरवत होता.
आरोपी मायकल कदर केवळ 1900 रूपयांमध्ये ऑनलाइन धमकी देण्याचं काम करतो. आतापर्यंत शेकडो लोकांना त्याने ईमेल बॉम्ब पाठवला आहे. जर कोणाच्या नावाने धमकी द्यायची असेल तर त्याच्यासाठी तो थोडे जास्त पैसे आकारायचा. ऑनलाइन धमकी यशस्वी नाही झाली तर मायकल ग्राहकाला त्याने दिलेले पैसे परत करतो. मायकल कदर याने ऑनलाइन धमकी देऊन आतापर्यंत जवळपास 30 कोटीच्या मुल्याचे बिटकॉइन कमावले आहेत.
आरोपीने अनेक देशांमध्ये शाळा, रूग्णालय, विमानतळ यासारख्या ठिकाणी 2000 ऑनलाइन धमक्या दिल्या आहेत. अमेरिकेच्या दिलावेयर राज्याचे स्टेट सेनेटर यांनाही त्याने धमकी देऊऩ ब्लॅकमेल केलं होतं. कॅलिफॉर्नियाचा एक व्यक्ती मायकल कदरला धमक्या देण्यासाठी सातत्याने पैसे देतो अशी माहिती अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयला मिळाली आहे. तेथील पोलिसांसोबत एफबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे.