कोरोनाचा कहर: अमेरिकेत २४ तासांत १९९७ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा ४०,६६१वर, अशी आहे भारताची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 09:06 AM2020-04-20T09:06:03+5:302020-04-20T09:10:48+5:30
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत रविवारपर्यंत ७, ५९,०८६ जणांना कोरोनाची लागण झाली. येथील तपासणीचा वेग आता आणखी वाढवण्यात आला असून संक्रमणापासून बचाव करण्यासाठी इतर उपायही केले जात आहेत.
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : अमेरिकेत करोना व्हायरसचा हाहाकार सुरूच आहे. गेल्या २४ तासांत तेथे १९९७ जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर तेथील एकूण मृतांचा आकडा आता ४०,६६१वर जाऊन पोहोचला आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने हा आकडा जाहीर केला आहे. याच्या एकदिवस आधी अमेरिकेत तब्बल १८९१ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता.
न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रयू क्यूमो कोरोनासंदर्भात बोलताना म्हणाले, कोरोना सध्या अत्यंत शक्तीशाली स्थितीत आहे. गेल्या बुधवारी अमेरिकेत २५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. कोरोनाने सर्वाधिक हाहाकार अद्याप अमेरिकेतच घातला आहे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत रविवारपर्यंत ७, ५९,०८६ जणांना कोरोनाची लागण झाली. येथील तपासणीचा वेग आता आणखी वाढवण्यात आला असून संक्रमणापासून बचाव करण्यासाठी इतर उपायही केले जात आहेत.
भारतात २४ तासांत १३२४ नवे रुग्ण :
जगाबरोबरच भारतातही कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे जगभरात दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २३ लाखहून अधिक लोकांचा याची लागण झाली आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या १६,११६ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १३२४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५१९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महत्वाचे म्हणजे २३०२ जण बरे होऊन घरीही परतले आहेत. कोरोनापासून बचावासाठी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे.
३० एप्रिल आणि १५ मे अधिक काळजीच्या तारखा -
आगामी ३० एप्रिल आणि १५ मे या दोन तारखा अधिक काळजीच्या असल्याचे केंद्र सरकारने कळविले असून या दोन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते अथवा कमीदेखील होऊ शकते. त्यामुळे अधिक सतर्क राहा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोनाचे रुग्ण ज्या तारखांना आढळत गेले त्यानुसार केंद्रीय आरोग्य विभागाने त्याची एक सायकल तयार केली असून त्यानुसार या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
तेलंगणा सरकारने लॉकडाऊन वाढवले -
कोरोनाचा वाढता फैलाव आणि रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन तेलंगणा सरकारने राज्यातील लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन 7 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे.
गोवा ठरले देशातील पाहिले कोरोनामुक्त राज्य -
देशातील पर्यटनाचे केंद्र आणि सतत देशी विदेशी पर्यटकांची वर्दळ असणारे गोवा राज्य कोरोनामुक्त झाले आहे. गोव्यामध्ये कोरोनाचे सात रुग्ण होते. मात्र, हे सातही रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा कोरोनामुक्त झाल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.