2 वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देणारा 'हा' देश ठरला जगातील पहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 11:39 AM2021-09-07T11:39:42+5:302021-09-07T11:40:35+5:30
Corona Vaccine : या लसींच्या क्लिनिकल चाचण्या मुलांवर पूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यांना अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही.
हवाना : कोरोना व्हायरसवर (Coronavirus) मात करण्यासाठी सध्या मुलांच्या लसीवरही जगभरात संशोधन किंवा चाचण्या सुरू आहेत. मुलांच्या प्रतिकारशक्तीवर आणि त्यांच्यासाठी सुरक्षित बनवण्यासाठी या लसीची चाचणी केली जात आहे. दरम्यान, असा एक देश आहे, ज्याठिकाणी 2 वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस (Corona Vaccine) मिळू लागली आहे. हा देश क्यूबा (Cuba)आहे.
या लहान देशाने यापूर्वी 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोना लस देण्यास सुरूवात केली होती. यानंतर 2 वर्षांच्या मुलांना ही लस दिली जात आहे. 2 वर्षांच्या मुलांना कोरोना लस देणारा हा जगातील पहिला देश ठरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, क्युबामधील लोकांना 2 कोरोना लस दिल्या जात आहेत. यामध्ये अब्दला आणि सोबराना लसींचा समावेश आहे.
या लसींच्या क्लिनिकल चाचण्या मुलांवर पूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यांना अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. क्यूबामध्ये 3 सप्टेंबर रोजी 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली. यानंतर सोमवारपासून देशात 2 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरूवात झाली आहे. या वयोगटातील मुलांना क्युबाच्या सिएनफुएगोस शहरात लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, अनेक देश 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी कोरोना लसीवर संशोधन करत आहेत. काही देशांमध्ये याची चाचणीही घेतली जात आहे. चीन, संयुक्त अरब अमिराती आणि व्हेनेझुएलासारख्या देशांनीही लहान मुलांना कोरोनाची लस लागू करण्याची घोषणा केली आहे. पण या लसीकरणाची अद्याप सुरुवात झाली नाही आहे.
याचबरोबर, भारतात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोनाची लस देण्याची तयारी केली जात आहे. या अंतर्गत झायडस कॅडिलाची कोरोना लस देशात आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे. ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाऊ शकते. यासंबंधीचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत.