तेल गळतीच्या हानीसाठी २० अब्ज डॉलर भरपाई
By admin | Published: April 6, 2016 04:41 AM2016-04-06T04:41:49+5:302016-04-06T04:41:49+5:30
सहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मेक्सिकोच्या आखातात झालेल्या प्रचंड तेल गळतीमुळे झालेल्या हानीच्या भरपाईसाठी २० अब्ज डॉलर भरपाई देण्याचे ब्रिटिश पेट्रोलियम
वॉशिंग्टन : सहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मेक्सिकोच्या आखातात झालेल्या प्रचंड तेल गळतीमुळे झालेल्या हानीच्या भरपाईसाठी २० अब्ज डॉलर भरपाई देण्याचे ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) बलाढ्य बहुराष्ट्रीय तेल कंपनीने मान्य केले आहे. ही तेल गळती ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण पर्यावरणीय दुर्घटना होती व कोणाही एका अपराध्याकडून वसूल केली गेलेली ही आजवरची सर्वाधिक भरपाई आहे.
मेक्सिकोच्या आखातात खनिज तेलाचे उत्खनन करण्यासाठी ‘बीपी’ने भाड्याने घेतलेल्या ‘डीपवॉटर होरायजन‘ या रिगवर २० एप्रिल २०१० रोजी स्फोट होऊन आग लागली होती. त्यात रिगवर काम करणाऱ्या १२६ पैकी ११ कामगारांचा मृत्यू झाला होता व १३४ दशलक्ष गॅलन तेलाची गळती होऊन ते समुद्रात पसरले होते.
या तेल गळतीमुळे झालेल्या पर्यावरणाच्या हानीबद्दल भरपाईसाठी अमेरिकेच्या संघीय सरकारखेरीज मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर असलेल्या अलाबामा, प्लोरिडा, ल्युझियाना, मिस्सिसिप्पी व टेक्सास या राज्यांनी तसेच त्या राज्यांमधील शेकडो नगरपालिकांनी न्यू आॅर्लियन्स येथील न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. न्यायालयाने गेल्या जुलैमध्ये ही तेलगळती ‘बीपी’च्या निष्काळजीपणाने झाल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर कंपनी आणि वादी सरकारे यांच्यात सहमतीने भरपाईची रक्कम ठरविण्यासाठी वाटाघाटी सुरु होत्या. त्यानुसार उभयपक्षी सहमतीने एकूण २०.८ अब्ज डॉलर भरपाईचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला गेला. संघीय न्यायाधीश कार्ल बार्बियर यांनी सोमवारी त्यास अंतिम मंजुरी देऊन त्यानुसार ‘डिक्री’ मंजूर केली. ही रक्कम कंपनीने पुढील १६ वर्षांत टप्प्याटप्प्याने द्यायची आहे. (वृत्तसंस्था)