अपघातग्रस्त विमानातील २१ जणांचे मृतदेह सापडले; ठाण्यातील चार जणांसह सर्व जणांचा मृत्यू झाल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 08:01 AM2022-05-31T08:01:39+5:302022-05-31T08:01:44+5:30
पोखरा येथून रविवारी सकाळी या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले.
काठमांडू : नेपाळमधील तारा एअर कंपनीच्या विमानाला रविवारी झालेल्या अपघातातील २१ मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. विमानातील ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चार जणांसह सर्व २२ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय खराब हवामानामुळे नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यात या विमानाला अपघात झाल्याचे सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी ऑफ नेपाळ (सीएएएन) या यंत्रणेने प्राथमिक चौकशी अहवालात म्हटले आहे.
पोखरा येथून रविवारी सकाळी या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले. जोमसोम येथे जाणाऱ्या या विमानात ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चार सदस्य, दोन जर्मन व १३ नेपाळी नागरिक असे १९ प्रवासी व ३ विमान कर्मचारी होते. विमानाचे अवशेष जिथे सापडले तिथे शोधकार्यासाठी सुमारे १०० जणांचे पथक कार्यरत आहे. त्यामध्ये नेपाळी लष्कराचे सैनिक, पोलीस, प्रशिक्षित गिर्यारोहक व स्थानिकांचा समावेश आहे. तारा कंपनीचे विमान कोसळल्यानंतर ते एका डोंगराला धडकले व त्याचे अनेक तुकडे झाले. त्या धडकेने विमानातील लोकांचे मृतदेह आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशात विखुरले गेले.
अपघातग्रस्त विमानाची जी छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत, त्यामध्ये या विनानाची शेपूट व एका पंखाचे अवशेष दिसत आहेत. नेपाळ सरकारच्या हेलिकॉप्टरमधून शोधपथकातील जवानांना अपघातस्थळी उतरविण्यात आले. रविवारी खराब हवामानामुळे अडथळे आल्याने थांबवावे लागलेले शोधकार्य सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आले. २०१६ साली तारा एअर कंपनीच्या विमानाला झालेल्या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ साली त्रिभुवन विमानतळावर झालेल्या विमान अपघातात ५१ जण ठार झाले होते. त्याआधी २०१२ साली सीता एअरच्या विमान अपघातात १९ जण, तर २०१२च्या विमान अपघातात १२ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)