२१वे शतक आशियाचे - पंतप्रधान
By Admin | Published: November 22, 2015 01:56 AM2015-11-22T01:56:20+5:302015-11-22T01:56:20+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दहशतवादाच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आसियानशी सहकार्य वाढविण्याचे आवाहन करण्यासह प्रादेशिक वाद शांततापूर्ण
क्वालालम्पूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दहशतवादाच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आसियानशी सहकार्य वाढविण्याचे आवाहन करण्यासह प्रादेशिक वाद शांततापूर्ण रीतीने मिटविण्याची गरजही अधोरेखित केली. २१ वे शतक आशियाई देशांचेच असेल, असा विश्वास व्यक्त करून मोदींनी जगाचा भारतावरील विश्वास वाढत असल्याचे नमूद केले. मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेले मोदी शनिवारी दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसियान) शिखर परिषदेत बोलत होते.
मोदी म्हणाले की, दहशतवाद जगासमोरील सर्वात मोठे आव्हान बनला असून, आम्हा सर्वांना प्रभावित करीत आहे. भारत व आसियान देश हे नैसर्गिक मित्र असून, फार पूर्वीपासून आमचे नाते जोडले गेले आहे, त्यात कोणताही दुरावा नाही. आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे मोदी म्हणाले. भारताचा आर्थिक आलेख पाहता, आपण पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होऊन ती मजबूत होत असल्याचे दिसत आहे, असे मोदी म्हणाले. भारतात या व येत्या काही वर्षांत आर्थिक विकास पाहायला मिळेल, अशी आशा जागतिक बँक व आयएमएफनेही व्यक्त केल्याचे सांगत आमच्या देशातील आर्थिक बदलाचे वारे अनुभवण्यासाठी आपणही यावे, असे निमंत्रण मोदींनी परिषदेत दिले. गेल्या १८ महिन्यांत देशाचा विकास तर झालाच; पण महागाईही कमी झाली आहे. कर उत्पन्नात देशांतर्गात उत्पन्नात वाढ झाली आहे. व्याजदरांत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)