सलग २२ दिवस कॉम्प्युटरवर गेम खेळल्याने युवकाचा मृत्यू!

By admin | Published: September 8, 2015 03:53 AM2015-09-08T03:53:40+5:302015-09-08T03:53:40+5:30

‘डिफेन्स आॅफ एन्शिअन्ट्स’ हा आॅनलाईन कॉम्प्युटर गेम सलग २२ दिवस खेळल्याने एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना रशियात घडली आहे.

22 days in a computer, the game of death on the computer! | सलग २२ दिवस कॉम्प्युटरवर गेम खेळल्याने युवकाचा मृत्यू!

सलग २२ दिवस कॉम्प्युटरवर गेम खेळल्याने युवकाचा मृत्यू!

Next

मॉस्को : ‘डिफेन्स आॅफ एन्शिअन्ट्स’ हा आॅनलाईन कॉम्प्युटर गेम सलग २२ दिवस खेळल्याने एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना रशियात घडली आहे.
‘तास’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या मुलाचे नाव रुस्तम असे होते व तो १७ वर्षांचा होता. दक्षिण रशियातील बाशकोर्तोस्तान प्रजासत्ताकातील उचाले शहरात ही घटना घडली.
पायाचे हाड मोडल्याने रुस्तम गेल्या ८ आॅगस्टपासून घरातच होता. अंथरुणावर पडून राहण्याचा कंटाळा आल्याने त्याने ‘डिफेन्स आॅफ एन्शियन्ट्स’ हा आॅनलाईन कॉम्प्युटर गेम खेळण्यास सुरुवात केली. या खेळातील त्याने निवडलेले पात्र युद्धात कामी आले आणि त्यानंतर रुस्तम त्याच्या घरात मरण पावला. अचानक बेशुद्ध पडल्याने त्याला इस्पितळात हलविण्यात आले, पण तत्पूर्वीच त्याचे प्राण गेले होते.
पोलीस विभागाच्या प्रवक्त्या स्वेतलाना अ‍ॅब्रामोवा यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षात रुस्तमने दोन हजार तासांहून अधिक वेळ आॅनलाईन कॉम्प्युटर गेम खेळले असावे असे दिसते. म्हणजे दिवसाला सरासरी साडेसहा तास!
पाय मोडल्याने घरात ‘अडकून’ पडल्यावर तर त्याने कहरच केला. शेवटचे २२ दिवस तो जवळजवळ अहोरात्र एकच गेम खेळत होता!
‘तास’च्या वृत्तानुसार न्यायालयाने नियुक्त केलेले वैद्यकीय तज्ज्ञ रुस्तमच्या मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्याचे काम करीत आहेत.
‘डेली मिरर’ या ब्रिटिश वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, मध्ये उठून इकडे तिकडे न फिरता दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने ‘थ्रॉम्बॉयसिस’ होऊन रुस्तमचा मृत्यू झाला असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. कुठेही न थांबता सलग उड्डाण करणाऱ्या विमानाच्या आसनावर अवघडलेल्या स्थितीत खूप वेळ बसूनही अनेकांना काहीसा असा त्रास होतो. (वृत्तसंस्था)


प्रिय पालकांनो, तुमच्या मुलांकडे लक्ष द्या! कॉम्प्युटर आणि इंटरनेट गेमचे त्यांना गुलाम बनू देऊ नका !!
- पावेल अस्ताखोव, बालहक्क न्यायपाल


...आणि रुस्तमची खोली एकदम शांत झाली
- रुस्तम आपल्या खोलीत गेम खेळत असे व तो काय करतो आहे याकडे त्याच्या पालकांचे लक्षही नसायचे. रुस्तमच्या पालकांनी पोलिसांना सांगितले की, त्याच्या खोलीतून नेहमी जोरजोरात कीबोर्ड दणकवल्याचा आवाज यायचा. पण ३० आॅगस्ट रोजी त्याची खोली एकदम शांत झाली.
- पालकांचे लक्ष नसल्याने रुस्तम सतत कॉम्प्युटर गेम खेळत असायचा. झोपेल तेवढाच त्यात खंड पडायचा. जेवणासाठीही तो उठून जात नसे. खेळता खेळताच तो काहीतरी पोटात ढकलायचा. कॉम्प्युटर गेमचे जणू त्याला व्यसनच जडले होते.

- कॉम्प्युटर गेमचे अतिवेड मुलांच्या जीवावर बेतण्याची ही पहिलीच घटना नाही. यंदाच्या मार्चमध्ये शांघायमधील एका इंटरनेट कॅफेमध्ये ‘वर्ल्ड आॅफ वॉरक्राफ्ट’ हा इंटरनेट कॉम्प्युटर गेम सलग १९ तास खेळल्यानंतर एका २३ वर्षांच्या चिनी मुलाचा मृत्यू झाला होता.

Web Title: 22 days in a computer, the game of death on the computer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.