ब्रिटनमध्ये अतिरेकी स्फोटात २२ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2017 03:27 AM2017-05-24T03:27:49+5:302017-05-24T03:27:49+5:30

मॅन्चेस्टरमध्ये सोमवारी रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या संगीताच्या कार्यक्रमातून हजारो लोक बाहेर पडत असताना इसिसने घडविलेल्या आत्मघाती स्फोटात २२ जण ठार

22 killed in blast in Britain | ब्रिटनमध्ये अतिरेकी स्फोटात २२ ठार

ब्रिटनमध्ये अतिरेकी स्फोटात २२ ठार

googlenewsNext

लंडन : मॅन्चेस्टरमध्ये सोमवारी रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या संगीताच्या कार्यक्रमातून हजारो लोक बाहेर पडत असताना इसिसने घडविलेल्या आत्मघाती स्फोटात २२ जण ठार, तर ५९ जण जखमी झाले. या कार्यक्रमासाठी तरुण व किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणात आली होती. या हल्ल्यात अशी अनेक मुले बळी पडली असल्याची शक्यता आहे. शो संपल्यावर एरियाना ही स्टेजवरून गेल्यानंतर हा स्फोट झाला.
ब्रिटिश पोलिसांनी सांगितले की, या स्टेडियमची क्षमता २१ हजार असून, ते पूर्णपणे भरले होते. लोक बाहेर पडतानाच हा स्फोट झाला. स्फोटानंतर लोक सैरावैरा पळू लागले. मॅन्चेस्टर एरिना हे शहराचे सर्वात मोठे ठिकाण आहे. येथे नेहमीच संगीताचे कार्यक्रम होतात. त्यामुळे तिथे अनेक टॅक्सी उभ्या असतात. स्फोट झाल्यानंतर लोकांना मोफत सुरक्षित पोहोचविण्याचे काम या टॅक्सीचालकांनी केले. तसेच स्थानिकांनीही अनेकांना रात्री आपल्या घरी राहण्याची व्यवस्था केली. या स्फोटात ठार झालेल्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव सलमान अबेदी असे होते व तो २२ वर्षांचा होता, असे मॅन्चेस्टर पोलिसांनी मंगळवारी रात्री जाहीर केले. मात्र तो कोणत्या देशाचा नागरिक होता हे त्यांनी लगेच उघड केले नाही. हल्लेखोराची ओळख पटल्यानंतर दहशतवादविरोधी पथकांनी संपूर्ण मॅन्चेस्टरमध्ये जोरदार धाड व झडतीसत्र सुरु केले. त्यात ठार झालेल्या हल्लेखोराच्या एका २२ वर्षांच्या संशयित साथीदारास अटक केली गेली. त्याचे नाव व नागरिकत्वही पोलिसांनी तूर्त जाहीर केले नाही.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.सर्वच देशांच्या प्रमुखांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही घटनेची निंदा केली आहे. ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवडे अगोदरच हा हल्ला झाल्याने थेरेसा मे आणि लेबर पार्टीचे जेरेमी कोर्बिन यांनी प्रचार मोहीम स्थगित केली आहे. लंडनमध्ये ७ जुलै २००५ मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. मध्य लंडनमध्ये त्यावेळी साखळी स्फोट घडवून आणण्यात आले होते. यात ५२ ठार, तर ७०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

Web Title: 22 killed in blast in Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.