अमेरिकेच्या तळांवर डागली 22 क्षेपणास्रे, 80 सैनिकांचा मृत्यू, इराणचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:35 PM2020-01-08T13:35:50+5:302020-01-08T13:36:33+5:30
मंगळवारी संध्याकाळी सुलेमानी यांना 'सुपुर्द ए खाक' केल्यानंतर इराणने त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या इराकमधील तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे जोरदार हल्ला केला.
तेहरान - इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव आता संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मंगळवारी संध्याकाळी सुलेमानी यांना 'सुपुर्द ए खाक' केल्यानंतर इराणने त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या इराकमधील तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे जोरदार हल्ला केला होता. दरम्यान, अमेरिकेच्या तळांवर एकूण 22 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यात 80 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केला आहे.
मंगळवारी रात्री इराणने क्षेपणास्रांद्वारे हल्ला करत अमेरिकेच्या इराकमधील तळांना लक्ष्य केले होते. दरम्यान, इराणकडून क्षेपणास्रांद्वारे अमेरिकेच्या तळांवर हल्ले झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेकडून दुजोरा देण्यात आला आहे. तसेच या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत पेंटागॉनकडून माहिती घेतली जात आहे.
अमेरिकेनं गेल्या आठवड्यात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. सुलेमानी यांच्या हत्येचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यावेळी इराणने अमेरिकेला दिला होता. यानंतर आता इराणने अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. दरम्यान, इराणच्या या कारवाईमुळे इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.