नॉर्वेमध्ये फायझरची लस घेतल्यानंतर २३ वयोवृद्धांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 01:00 AM2021-01-17T01:00:54+5:302021-01-17T01:02:00+5:30
लस घेतल्यानंतर काही काळातच मरण पावलेल्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, याचा वैद्यकीय तज्ज्ञ शोध घेत आहेत. फायझरची लस घेतल्यानंतर ८० वर्षे वयापुढील नागरिकांपैकी काही जणांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम झाल्याचेही आढळून आले.
ऑस्लो : नॉर्वे या देशात लसीकरण मोहिमेत फायझरची कोरोना लस दिल्यानंतर काही काळातच २३ वयोवृद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक प्रकाराची नॉर्वे सरकारकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्याशिवाय फायझरची कोरोना लस घेतल्यानंतर अनेक लोक आजारी पडल्याचेही उजेडात आले आहे.
लस घेतल्यानंतर काही काळातच मरण पावलेल्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, याचा वैद्यकीय तज्ज्ञ शोध घेत आहेत. फायझरची लस घेतल्यानंतर ८० वर्षे वयापुढील नागरिकांपैकी काही जणांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम झाल्याचेही आढळून आले. मरण पावलेल्या २३ पैकी १३ जणांमध्ये ताप येणे, अतिसार ही लक्षणे आढळून आली. एमआरएनए प्रकारची लस घेतली की अशी लक्षणे आढळतात.
नॉर्वेत झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर फायझर कंपनीने युरोपीय देशांना होणारा लसीचा पुरवठा तात्पुरता कमी केला आहे. सध्या १.३ अब्ज डोस बनविण्याच्या दृष्टीने काम सुरू होते, असे नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेने म्हटले आहे.