वाहने थांबवली, चौकशी केली अन् २३ जणांना घातल्या गोळ्या; मोठा दहशतवादी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:56 PM2024-08-26T12:56:00+5:302024-08-26T12:56:51+5:30
Terrorist Attack in Pakistan : बलुचिस्तान प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अनेक बस, ट्रक आणि व्हॅन रोखल्या. त्यानंतर दहशतवाद्यांनी जात ओळखून लोकांना गोळ्या घातल्याचे सांगण्यात येत आहे.
Terrorist Attack in Pakistan : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी २३ जणांची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बलुचिस्तानमध्ये सोमवारी २३ जणांना जबरदस्तीने त्यांच्या वाहनांमधून बाहेर काढले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. एएफपीच्या वृत्तानुसार, बलुचिस्तान प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अनेक बस, ट्रक आणि व्हॅन रोखल्या. त्यानंतर दहशतवाद्यांनी जात ओळखून लोकांना गोळ्या घातल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत पाच जण जखमीही झाले आहेत. मुसाखेलचे वरिष्ठ अधिकारी नजीबुल्ला काकर यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी पंजाबला बलुचिस्तानशी जोडणाऱ्या महामार्गावर अनेक बस, ट्रक आणि व्हॅन थांबवल्या. त्यानंतर हा हल्ला केला. या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले. पुढे ते म्हणाले की, पंजाबमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आणि पंजाबमधून येणाऱ्या लोकांची ओळख पटवून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.
१० वाहनांना लावली आग
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, सहाय्यक आयुक्त नजीब काकर यांनी सांगितले की, सशस्त्र लोकांनी मुसाखेल येथे महामार्ग रोखला आणि प्रवाशांना खाली उतरवले. तसेच, त्यांनी १० वाहनेही पेटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे.
काय म्हणाले बलुचिस्तानचे मुख्यमंत्री?
या घटनेनंतर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी निवेदन जारी केले आहे. या दहशतवादी घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. निवेदनानुसार, त्यांनी दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्यात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. बलुचिस्तान सरकार दोषींना शिक्षा देईल.