विमान अपघातात २३ जण ठार
By admin | Published: February 25, 2016 03:23 AM2016-02-25T03:23:35+5:302016-02-25T03:23:35+5:30
नेपाळच्या पर्वतीय प्रदेशात उड्डाण करताना एक छोटे प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त होऊन विमानातील सर्व २३ जण मरण पावले. त्यात दोन विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
काठमांडू : नेपाळच्या पर्वतीय प्रदेशात उड्डाण करताना एक छोटे प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त होऊन विमानातील सर्व २३ जण मरण पावले. त्यात दोन विदेशी नागरिकांचा समावेश आहे. विमान दुर्घटनाग्रस्त झाले त्यावेळी हवामान खराब होते आणि समोरचे स्पष्ट दिसत नव्हते.
तारा एअरचे टिष्ट्वन-ओट्टर विमान पोखरा विमानतळावरून जोमसोमसाठी उड्डाण करताच काही मिनिटातच बेपत्ता होऊन दुर्घटनाग्रस्त झाले.
राजधानी काठमांडूपासून २०० कि.मी. पश्चिमेला पोखरा हे रिसॉर्टचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. अनेक गिर्यारोहक जोमसोम येथून हिमालयात गिर्यारोहणास प्रारंभ करतात.
विमानात २ विदेशी नागरिक आणि २ मुले यांच्यासह २० प्रवासी होते. या विदेशी नागरिकांत एक चिनी आणि एक कुवैती असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित प्रवासी नेपाळचे नागरिक आहेत.
पोखरा झोनल पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने स्थानिक लोकांचा हवाला देऊन सांगितले की, उत्तर नेपाळमधील मुस्तांग आणि म्याग्दी जिल्ह्यांच्या दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाले. शोधकार्यासाठी काठमांडूहून तीन हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर नेपाळी लष्कर, पोलिसांनाही दुर्घटनास्थळी पाठविण्यात आले आहे.
विमान कंपनीने आपल्या वेबसाईटवर मात्र हवामान चांगले होते आणि नियंत्रण कक्षाने विमान उड्डाणाला परवानगी दिली होती, असा दावा केला आहे. विमान नेमके कशामुळे दुर्घटनाग्रस्त झाले हे कळू शकले नाही.
आतापर्यंत ७०० नागरिक ठार
नेपाळमध्ये १९४९ मध्ये पहिले विमान उतरले होते. तेव्हापासून आतापर्यंत तेथे ७० पेक्षा अधिक विमान किंवा हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत. त्यात किमान ७०० पेक्षा जास्त नागरिक ठार झाले आहेत.
युरोपीय संघाने २०१३ मध्ये सर्व नेपाळी विमान कंपन्यांना तेथे उड्डाण करण्यास बंदी घातली होती. २०१४ मध्ये नेपाळ एअरलाईन्सचे एक विमान पश्चिमेला बर्फाच्छादित पर्वतावर आदळून दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यात १८ जण मरण पावले होते.