मलेशियामधील शाळेत गेल्या 20 वर्षातील भीषण आग, दोन कर्मचा-यांसह 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 01:40 PM2017-09-14T13:40:12+5:302017-09-14T13:44:40+5:30
मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालांलपूर येथील एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे
क्वालांलपूर, दि. 14 - मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालांलपूर येथील एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, तहफीज दारूल कुराण इत्तिफकिया असं या शाळेचं नाव आहे. जेव्हा आग लागली तेव्हा विद्यार्थी झोपेत होते. आगीमध्ये 23 विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
अग्निशन दलाचे संचालक खिरुदीन द्रहमन यांनी एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 23 लहान मुलं आणि 2 वॉर्डनचा समावेश आहे. मृत पडलेल्या मुलांचं वय अद्याप कळलेलं नाही. शाळेला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका तासानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. यानंतर काही मुलांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही मुलांनी श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याची तक्रार केली होती.
गेल्या 20 वर्षातील आगीच्या घटनांमधील ही सर्वात भयंकर आग असू शकते असा दावा अधिका-यांनी केला आहे. काही दिवसांपुर्वी, आगीच्या वारंवार घटना होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मलेशिया प्रशासनाने खासगी शाळांमधील सुरक्षेच्या उपायांवर चिंता व्यक्त केली होती.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 पासून ते आतापर्यंत आगीच्या 200 घटना घडल्या आहेत. प्रधानमंत्री नजीब रज्जाक यांनी ट्विट करत घटनेवर दुख: व्यक्त केलं आहे.