इक्वेडॉरमध्ये भूकंपात २३३ मृत्युमुखी

By admin | Published: April 18, 2016 02:35 AM2016-04-18T02:35:34+5:302016-04-18T02:35:34+5:30

इक्वेडॉरमध्ये झालेल्या भूकंपात २३३ जण मृत्युमुखी पडले तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद ७.८ इतकी नोंदविली गेली. उपराष्ट्रपती जॉर्ज ग्लास यांनी

233 dead in Ecuador earthquake | इक्वेडॉरमध्ये भूकंपात २३३ मृत्युमुखी

इक्वेडॉरमध्ये भूकंपात २३३ मृत्युमुखी

Next

क्विटो : इक्वेडॉरमध्ये झालेल्या भूकंपात २३३ जण मृत्युमुखी पडले तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद ७.८ इतकी नोंदविली गेली. उपराष्ट्रपती जॉर्ज ग्लास यांनी ही माहिती दिली. दरम्यान, भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा सुरुवातीस देण्यात आला होता पण, नंतर हा धोका बहुतांश टळल्याचे सांगण्यात आले.
या भूकंपात ५८८ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भूकंप झाला. इक्वेडॉरसह उत्तरी पेरु आणि दक्षिणी कोलंबियातही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, इक्वेडॉरमध्ये सहा प्रांतात आपत्कालिन स्थिती घोषित करण्यात आली आहे. तथापि, इक्वेडॉरचे राष्ट्रपती राफेल कोरेया हे इटलीचा दौरा अर्धवट सोडून स्वदेशी परतत आहेत.
मृत आणि जखमींचा आकडा वाढू शकतो अशी भीती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कारण, भूकंपाने प्रभावित असलेल्या अनेक भागात अद्याप मदतकार्य पोहचू शकलेले नाही. भूकंपाचे केंद्र असलेल्या पेडरनल शहरात १२ पेक्षा अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या असल्याची माहिती या शहराचे महापौर गाबरियेए अल्सिवर यांनी दिली. आम्ही मदत कार्य सुरु केले आहे. या भूकंपात पूर्ण शहरच उद्ध्वस्त झाल्याचे या महापौरांनी सांगितले.
भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनंतर राजधानी क्विटोमध्ये नागरिक घराबाहेरुन थेट रस्त्यावर आले आहेत. देशात अनेक भागात हीच परिस्थिती आहे. पोर्टोविजो शहरात १६, मंतामध्ये १० तर गुयास भागात दोन जण मृत्युमुखी पडले आहेत.
देशातील जियोफिजिक्स इन्स्टिट्यूटने सांगितले की, या भूकंपाने गुयाक्विल आणि भूकंपाचे केंद्र असलेल्या भागात अधिक नुकसान झाले. राजधानी क्विटोमध्ये वीज आणि फोन सेवा बंद पडली आहे. नागरिक व्हॉटसअ‍ॅपच्या मदतीने एकमेकांच्या संपर्कात आहेत.

कधी आणि कुठे?
हा भूकंप शनिवारी रात्री आंतरराष्ट्रीय वेळेनुसार ११ वाजून ५८ मिनिटांनी क्विटोपासून १७० किमी उत्तर पश्चिम भागात झाला. या भूकंपाचे धक्के तब्बल एक मिनिट जाणवले. इक्वेडॉर, उत्तर पेरू आणि दक्षिण कोलंबियात हा भूकंप जाणवला. मोठ्या भूकंपानंतर कमी तीव्रतेचे भूकंपाचे ५५ धक्के जाणवल्याचे उप राष्ट्रपती जॉर्ज ग्लास यांनी सांगितले.

टोंगो बेटही भूकंपाने हादरले
सिडनी : दक्षिण-पूर्व प्रशांत महासागरातील टोंगो बेटही भूकंपाने हादरले. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने सांगितले की,भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ एवढी नोंदली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी नुकुअलोफापासून २७७ कि.मी. आणि दक्षिण-पूर्वमध्ये ६६ कि.मी. खोल होता.

Web Title: 233 dead in Ecuador earthquake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.