अमेरिकेतील भारतीयांनी घेतली २४०० खेडी दत्तक
By admin | Published: May 16, 2015 03:43 AM2015-05-16T03:43:07+5:302015-05-16T03:43:07+5:30
स्मार्ट व्हिलेज - स्मार्ट वॉर्ड योजनेअंतर्गत अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांनी आंध्र प्रदेशातील २४०० खेडी दत्तक घेतली आहेत
वॉशिंग्टन : स्मार्ट व्हिलेज - स्मार्ट वॉर्ड योजनेअंतर्गत अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांनी आंध्र प्रदेशातील २४०० खेडी दत्तक घेतली आहेत. या खेड्यांचा विकास हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नर लोकेश अमेरिकेतील लॉस एंजिल्स, सॅन होजे, शिकागो, न्यू यॉर्क, न्यू जर्सी, वॉशिंग्टन, पोर्ट लँड व डलास येथील अनेक भारतीय नागरिकांना भेटला व त्याने आंध्र प्रदेशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
स्मार्ट व्हिलेज-स्मार्ट वॉर्ड ही योजना अनेक लोकांना आवडली व त्यांनी २४००पेक्षा जास्त खेडी दत्तक घेतली. आंध्र प्रदेश लवकरच भारतातील एक समर्थ राज्य बनेल व देशासमोर नवे आदर्श प्रस्थापित करील, असे लोकेश याने तेलगू एनआरआय समुदायासमोर बोलताना सांगितले. लोकेश याने टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट व लुईसियानाचे भारतीय गव्हर्नर बॉबी जिंदाल यांचीही भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेतील भारतीयांनी देशाच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले होते. त्या वेळी त्यांनी ‘मेक इन इंडिया’चा नाराही दिला होता. त्यानंतरच्या प्रयत्नातून ही खेडी दत्तक घेण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)