Corona Virus: कोरोना परततोय! युराेप, मध्य आशियात ८ दिवसांत २४ हजार मृत्यू; आणखी एका लाटेची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 06:02 AM2021-11-05T06:02:29+5:302021-11-05T06:04:01+5:30
Corona Virus in Europe, Asia: वर्षभरापूर्वी आम्ही जिथे हाेताे, आज पुन्हा त्याच वळणावर आलाे आहाेत. मात्र, विषाणूबाबत तुलनेने अधिक माहिती आहे. तसेच चांगले उपकरण उपलब्ध आहेत.
जिनेव्हा : युराेप आणि मध्य आशिया खंडातील ५३ देशांमध्ये काेराेनाच्या आणखी एका लाटेची भीती जागतिक आराेग्य संघटनेने व्यक्त केली आहे. या भागात गेल्या आठवडाभरात १८ लाख नवे रुग्ण आढळले असून, २४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक आराेग्य संघटनेच्या विभागीय कार्यालयाच्या प्रमुख डाॅ. हॅन्स क्लूज यांनी नव्या रुग्णांची संख्या पुन्हा रेकाॅर्ड पातळीवर पाेहाेचत असल्यावरून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले, की या ५३ देशांमध्ये आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे किंवा नव्या लाटेचा सामना करीत आहेत. संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. युराेप पुन्हा एकदा महामारीच्या केंद्रस्थानी आला आहे.
वर्षभरापूर्वी आम्ही जिथे हाेताे, आज पुन्हा त्याच वळणावर आलाे आहाेत. मात्र, विषाणूबाबत तुलनेने अधिक माहिती आहे. तसेच चांगले उपकरण उपलब्ध आहेत. डाॅ. क्लूज यांनी सांगितले, की संसर्ग राेखण्यासाठीचे उपाय आणि काही क्षेत्रात लसीकरणाचा कमी दर चिंतेचा विषय आहे. रुग्णसंख्या का वाढत आहे, याचे उत्तर त्यातून मिळते. आठवडाभरात मृतांचा आकडा १२ टक्क्यांनी वाढून २४ हजारांवर गेला आहे. तसेच १८ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. यातही सहा टक्के वाढ झाली आहे.
...तर फेब्रुवारीपर्यंत पाच लाख मृत्यू
गेल्या आठवड्यात ५३ देशांमध्ये काेराेनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे.
हीच परिस्थिती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत आणखी पाच लाख लाेकांचा महामारीमुळे मृत्यू हाेऊ शकताे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
रशियामध्ये ११९५ रुग्णांचा मृत्यू
रशियामध्ये काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये रशियात ११९५ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. दरराेज एक हजारांहून अधिक जणांचा मृत्यू आणि ४० हजारांहून अधिक रुग्णांची नाेंद हाेत असल्याने चिंता वाढली आहे.
ब्रिटनमध्ये ४० हजार नवे रुग्ण
ब्रिटनमध्येही दरराेज सरासरी ३५ ते ४० हजार नवे रुग्ण आढळत आहेत. मात्र, हा आकडा गेल्या दाेन आठवड्यांपासून कमी हाेत आहे.