तुर्कस्तान खाणस्फोटात २४५ ठार
By admin | Published: May 15, 2014 03:17 AM2014-05-15T03:17:54+5:302014-05-15T03:17:54+5:30
पश्चिम तुर्कस्तानातील एका कोळसा खाणीत झालेल्या जबरदस्त स्फोटात २४५ पेक्षा जास्त कामगार ठार झाले असून, शेकडो कामगार खाणीत अडकले आहेत.
सोमा : पश्चिम तुर्कस्तानातील एका कोळसा खाणीत झालेल्या जबरदस्त स्फोटात २४५ पेक्षा जास्त कामगार ठार झाले असून, शेकडो कामगार खाणीत अडकले आहेत. सरकारने आज ही घोषणा केली असून, खाणीत अडकलेल्या कामगारांना सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. मनिसा प्रांतातील खाणीत मंगळवारी हा स्फोट झाला तेव्हा ७८७ कामगार आत काम करत होते. बचाव व मदतकार्य चालू केले असून, ४५० जणांना जिवंत वर काढले आहे, त्यातील ८० जण जखमी असून चारजण गंभीर असल्याचे तुर्कस्तानचे ऊर्जामंत्री तानेर यिल्डीज यांनी सांगितले. खाणीत धूर पसरला असून, मदतीसाठी आलेले लोकही जखमी झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. जसजसा वेळ जात आहे, तशी मृतांची संख्या वाढण्याची भीती वाढत आहे. या खाणीत कप्पे आहेत, त्यातून कामगारापर्यंत जाता येते, यातील एक कप्पा खुला असून, दुसरा तिथे कामगार जमले असल्याने बंद आहे असे एका मदत कार्यकर्त्याने सांगितले. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी १२.३० वाजता हा अपघात झाला. सेना इस्बिलर या महिलेचा मुलगा खाणीत अडकला आहे, त्याची अजूनही सुटका झालेली नाही. अरुम उंझार हा खाणकामगारांचा मित्र असून बळी गेलेले सर्व आपलेच मित्र आहेत, असे त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)