२५ चिनी लढाऊ विमाने, ३ जहाजांची बेटांकडे कूच; तैवानच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 08:27 AM2023-03-02T08:27:38+5:302023-03-02T08:27:51+5:30
चीन-अमेरिकेत तणाव कायम
तैपेई : चीनने बुधवारी सकाळी २५ युद्ध विमाने आणि तीन युद्धनौका तैवानच्या दिशेने पाठवल्या आहेत, त्यावरून चीन आणि अमेरिकेत तणाव कायम आहे, असा दावा तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
मंत्रालयाने सांगितले की जहाजे तैवान सामुद्रधुनीमध्ये ठाण मांडून बसली असताना, १९ लढाऊ विमाने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात आली होती. तैवानने संरक्षण प्रणाली सक्रिय करून आपण प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचा इशारा दिला आहे.
चीन “ग्रे झोन” रणनीतीअंतर्गत दररोजच तैवानला धमकावणे, त्यांचे कर्मचारी थकवणे आणि लोकांचे मनोधैर्य खच्ची करणे या उद्देशाने अशा प्रकारची घुसखोरी करत असतो. यामध्ये सायबर युद्ध आणि विकृतीकरण मोहिमांचा समावेश होतो.
चीनचा इशारा
अमेरिकेने तैवान प्रकरणावर आपली भूमिका बदलण्यास नकार दिला आणि चुकीच्या मार्गावर गेला, तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि त्याची खरी किंमत अमेरिकेला भोगावी लागेल, असा इशारा चीनचे प्रवक्ते माओ निंग यांनी दिला आहे.