अमेरिकेत गोळीबारात २६ ठार , चर्चमध्येच केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:02 AM2017-11-07T05:02:19+5:302017-11-07T05:02:23+5:30
अमेरिकेत टेक्सासच्या सदरलँड स्प्रिंग्स स्थित फर्स्ट बाप्टिस्ट चर्चमध्ये एका बंदूकधारी व्यक्तीने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात प्रार्थनेसाठी आलेल्या २६ जणांचा मृत्यू झाला.
मेघनाद बोधनकर
वॉशिंग्टन / टोकियो : अमेरिकेत टेक्सासच्या सदरलँड स्प्रिंग्स स्थित फर्स्ट बाप्टिस्ट चर्चमध्ये एका बंदूकधारी व्यक्तीने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात प्रार्थनेसाठी आलेल्या २६ जणांचा मृत्यू झाला. या गोळीबारामुळे अमेरिका पुन्हा हादरून गेली आहे. या हल्ल्याचा दहशतवादाशी संबंध नसला, तरी आता तरी शस्त्रांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, असे मत अमेरिकन लोकच व्यक्त करीत आहेत.
मात्र, जपान दौºयावर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा निषेध करताना, या घटनेमुळे ‘बंदुकांवरील नियंत्रण’ आणण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केले आहे.
सैन्यात वापरतात तशी रायफल घेऊन हा हल्लेखोर आला होता आणि त्याने चर्चमध्ये गोळीबार केला. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी २६ नागरिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एफबीआय तपास करत आहे. हा अतिरेकी हल्ला नाही, असे अधिकारी सांगत आहेत. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारात बाप्टिस्ट चर्चमध्ये प्रार्थनेसाठी लोक जमले असताना, एका इसमाने आत शिरून अंदाधुंद गोळीबार केला. त्यात जे २६ जण मरण पावले, त्यात पाच वर्षांच्या एका मुलापासून ते ७२ वर्षे वयाच्या वृद्धाचा समावेश आहे. मृतांमध्ये एक गरोदर महिलाही होती.
काही वेळाने गोळीबार करणारा इसमही कारमध्ये मृतावस्थेत आढळला. तो कशामुळे मरण पावला, हे समजू शकले नसून, आम्ही त्याचा शोध घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. डेव्हिड पॅट्रिक केली असे त्याचे नाव असून, तो २६ वर्षांचा होता. त्याने गोळीबार का केला, हे समजू शकलेले नाही. मात्र, हा दहशतवादाचा प्रकार नाही, असेही पोलीस म्हणाले. ट्रम्प म्हणाले की, या घटनेतील पीडितांच्या व त्यांचे कुटुंबीयांच्या दु:खात केवळ मीच नव्हे, तर सारा आहे. त्यांची साथ आम्ही सोडणार नाही.
बंदुकांवर नियंत्रणाची
गरज नाही : ट्रम्प
या गोळीबारानंतर पुन्हा एकदा बंदुकांवर नियंत्रण आणण्याचा मुद्दा पुढे आला आहे. मात्र, ट्रम्प यांनी हा मुद्दा फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की, हा गोळीबार बंदूकधारीच्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. सुरुवातीच्या तपासातून असे दिसते की, हा इसम अतिशय व्यथित होता. देशात मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आहेत.
न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ११ सप्टेंबर, २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर, अमेरिकेत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत १०३ जण ठार झाले आहेत. गोळीबारात इतके लोक मरण पावल्यानंतरही अमेरिकेने बंदुकांची विक्री आणि बंदुकांच्या मालकीला आवर घालण्याचा फारच किरकोळ प्रयत्न केला आहे.
शस्त्रखरेदीची सरकारला माहितीच नसते
लास वेगासमधील हल्लेखोर स्टीफन पॅडॉक याने गोळीबार का केला, हे अजून निश्चित झालेले नाही. त्याने हल्ला करायच्या आधी १२ महिन्यांत ३३ बंदुका विकत घेतल्या होत्या. बहुतेक जण रायफली विकत घेतात. एकच जण अनेक बंदुका का विकत घेतो, याची माहिती दारू, तंबाखू, शस्त्रे आणि स्फोटके विभागाला बंदुका विकणारे दुकानदार देत नाहीत.
गन कल्चरमुळे दहा महिन्यांत १३,१४९ बळी
अमेरिकेत गन कल्चरने या वर्षी आतापर्यंत
52,385
हल्ले झाले
असून, त्यात
13,149
जण मरण
पावले आहेत.
गन व्हायलन्स
अर्काइव्हने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी 307 सामूहिक गोळीबार झालेले आहेत. (गन व्हायलन्सचा अर्थ गोळीबारात हल्लेखोर वगळता चार किंवा पाच जण ठार मारले गेले, असा आहे.)
अमेरिकेत १९४९ पासून पाच
घातक असे सामूहिक गोळीबाराचे प्रकार घडले. त्यातील दोन गेल्या
३५ दिवसांत घडले
आहेत आणि तेही
डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष
झाल्यानंतर.
लास वेगासमध्ये गेल्या १ आॅक्टोबर रोजी स्टीफन पॅडॉक याने संगीताच्या कार्यक्रमात अंधाधुंद गोळीबार केला होता.
त्यात 58 जण ठार झाले.
रविवार, ५ नोव्हेंबर रोजी टेक्सासमधील
चर्चमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात
२६ जण ठार, तर २० जण जखमी झाले. या आधी दोन दिवसांपूर्वीही अमेरिकेत गोळीबाराचा
प्रकार झाला होता.