कब्रस्तानात मिळाले २६०० वर्षे जुने पनीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 09:35 AM2022-09-27T09:35:03+5:302022-09-27T09:35:31+5:30
पुरातत्व विभागाने केलेल्या खोदकामात २६०० वर्षे जुने पनीर मिळाले आहे.
कैरो : एका मातीच्या भांड्यात पनीर कधीपर्यंत राहू शकते? एक दिवस, एक महिना, की एक वर्ष? साहजिकच असा विचार कोणी करणार नाही. पण इजिप्तमध्ये पुरातत्व विभागाने केलेल्या खोदकामात २६०० वर्षे जुने पनीर मिळाले आहे. विशेष म्हणजे हे मातीच्या एका भांड्यात सापडले आहे.
इजिप्तमधील पर्यटन विभागाने सांगितले की, सक्काराच्या कब्रस्तानमध्ये १० सप्टेंबर रोजी हे पनीर आढळून आले आहे. या मातीच्या भांड्यावर प्राचीन भाषेत काही लिहिलेले आहे. भांड्यात पांढऱ्या पनीरचे काही तुकडे मिळाले आहेत. पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांचे असे मत आहे की, हे पनीर २६ व्या अथवा २७ व्या इजिप्तच्या साम्राज्याच्या काळातील आहे.
हे पनीर २६०० वर्षे जुने आहे. हे पनीर शेळी आणि मेंढीच्या एकत्र केलेल्या दुधापासून बनविण्यात आले आहे. यात अनेकदा गायीचे दूधही एकत्र करण्यात येते. यापूर्वीही अशाच एका भांड्याचा शोध लागला होता व त्यात जे पनीर मिळाले होते. ते ३२०० वर्षे जुने होते.