२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर रेहमानला जामीन
By Admin | Published: December 18, 2014 03:03 PM2014-12-18T15:03:15+5:302014-12-19T05:38:24+5:30
पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केला आहे.
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. १८ - दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलू अशी वल्गना पाकच्या पंतप्रधानांनाी केली असतानाच पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केला आहे. एकीकडेे मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद पाकमध्ये मोकाट फिरत असतानाच लखवीलाही जामीन मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
२६/११ च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी झकीर उर रेहमान लखवी आणि अन्य सात जणांविरोधात पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयात खटला सुरु आहे. याप्रकरणी पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी लखवी, अब्दूल वाजीद, मझहर इक्बाल, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद आणि युसूफ अंजूम यांना २००९ मध्ये अटक केली होती. या सर्वांविरोधात मुंबई हल्ल्यांचा कट रचणे, आर्थिक सहाय्य करणे अशा विविध कलमांखाली खटला सुरु आहे. याप्रकरणातील झकीर उर रेहमान लखवीला गुरुवारी पाकिस्तानमधील न्यायालयाने पाच लाख रुपयांच्या बॉंडवर जामीन मंजूर केला.